ऑनलाइन पद्धतीने मडगावात पावणेतीन लाखांची फसवणूक

0
18

मडगाव शहर परिसरात नोकरीचे आमिष व फ्लॅटप्रकरणी दोघांची पावणेतीन लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या दोन तक्रारी मडगाव पोलीस स्थानकावर नोंद झाल्या असून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. नोकरीच्या आमिषाने ब्रिटीश नागरिकाने फसवणूक केल्याची तक्रार म्युरेल व्हाज, नावेली यांनी पोलिसांत नोंद केली असल्याचे पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी सांगितले. नोकरीच्या शोधात असलेल्या नावेली येथील ओडिसी संकुलात राहणाऱ्या म्युरेल व्हाज यांची फेसबूकवर विदेशी नागरिक विल्यम जॅक्सन यांच्याशी ओळख झाली. म्युरेल यांनी विल्यमकडे नोकरीसंबंधी बोलणी केली. लगेच विल्यम याने नोकरीसाठी काही प्रभागात पैसे द्यावे लागतील असे कळविले. म्युरेलने ऑनलाईन बँकींगच्या सुविधेने टप्प्याटप्याने 1.75 लाख विल्यम जॅक्सनच्या खात्यात जमा केले. त्यानंतर विल्यम बेपत्ता झाला.

भाड्याचा फ्लॅट प्रकरण
फ्लॅट भाड्याने हवा असल्याचे सांगून सचिन शर्मा याने आके बाईश येथील सुरेंद्र व्ही. नाईक यांच्याशी संपर्क साधत आपण आगावू रक्कम ऑनलाइन बँकींग युपीआय किंवा गुगल पेवरून पाठवितो असे कळविले. संशयिताने मोबाइल क्रमांकावरून नाईक यांच्या खात्यात गुगल पेवरून एक रूपया जमा केला. त्यांनतर ऑनलाईन बँकींगद्वारे नाईक यांच्या बँक खात्यातून 99 हजार रूपये काढले.