आसगाव येथे ऑनलाइन जुगार चालविणाऱ्या 12 जणांच्या आंतरराज्य टोळीला हणजूण पोलिसांनी काल अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 लाख 50 हजार रुपयांचे ऑनलाइन व्यवहार तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.
आसगाव येथील एका रिसोर्टच्या फ्लॅटमधून ऑनलाइन जुगार चालविला जात होता. पोलिसांनी या फ्लॅटवर पहाटेच्या वेळी छापा घालून 12 संशयित आरोपींना अटक केली. संशयित आरोपी गुजरात आणि राजस्थानमधील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून 7 लॅपटॉप, 8 मोबाईल फोन व इतर जुगार साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. जुगार कायद्याच्याअर्तंगत ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे हणजूण पोलिसांनी आसगाव येथे छापा मारला. अटक केलेल्यांमध्ये राजस्थान आणि गुजरातमधील लोक आहेत. त्यामध्ये असलम मोहम्मद (भिलवाडा, राजस्थान), मोहम्मद हुसैन (चित्तोडगड, राजस्थान), वसीम मोहम्मद (उदयपूर, राजस्थान), अयान अली बुखारी (चित्तोडगड, राजस्थान), अझान इरफान नागोरी (गुजरात), वहोरा मोहम्मद अब्दुलकरीम (गुजरात), वहोरम सलीमभाई (गुजरात), महोन अल्फाज अब्दुलरशीद (गुजरात), पठाण दिलशान खान (गुजरात), मोहम्मद अफजल खान सोर्गार (राजस्थान), मोहम्मद इनायत शाह (राजस्थान) व शराफत खान (राजस्थान) यांचा समावेश आहे. याप्रकरणी या सर्वांविरोधात हणजूण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.