ऐन दिवाळीत पोहे, कांदे-बटाटे महागले

0
111

आज सर्वत्र दिवाळी सण साजरा केला जात असतानाच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असल्याचे व दिवाळीसाठीचा खर्च कसा करायचा या विवंचनेत असल्याचे काल दिवाळीच्या पूर्वसंध्येला दिसून आले.सर्वसामान्य लोकांना रोज लागणार्‍या कांदे व बटाट्यांचे भाव गगनाला भिडल्याने खरेदीसाठी आलेल्या गृहिणींच्या चेहर्‍यांवर चिंतेचे सावट दिसत होते. कांदे व बटाटे यांचे दर ४० रु. प्रती किलो असे भडकले आहेत. त्यामुळे कांदे व बटाटे पोहे करण्यासाठी यंदा जादा पैसे मोजावे लागणार असल्याची चिंता गृहिणींना सतावत असल्याचे काल दिसून आले. शिवाय ज्या पोह्यांशिवाय दिवाळी सण साजराच होऊ शकत नाही ते पोहेही महाग झालेले असून ८० रु. किलो या दराने काल बाजारात त्यांची विक्री सुरू होती. याआधी पोहे ५० ते ६० रु. प्रती किलो होते. पणजी, मडगाव, म्हापसा, फोंडा, वास्कोसह अन्य सर्व शहरांत आठ दिवसांपूर्वीच पोहे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. बाजारपेठात नरकासूराचे मुखवटे आठ दिवसांपूर्वीच दर्शन देऊ लागले होते. छोट्या मुखवट्यांचे दर २०० ते ३०० तर मोठ्या मुखवट्यांचे दर १ हजार रु. पासून ३००० रु. पर्यंत होते. शंभर रु. पासून हजार रु. पर्यंतचे आकाशकंदिलही बाजारात उपलब्ध आहेत. रोषणाईसाठीच्या सामानाची बाजारपेठ चीनने काबीज केल्याने हे सामान तेवढे स्वस्तात उपलब्ध होऊ लागले आहे.
दरम्यान, उद्या लक्ष्मीपूजन होणार असल्याने लक्ष्मीदेवीचे फोटोही बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आलेले असून ते २०० रु. पासून (छोटे) ते ८०० रु. पर्यंत (मोठे) उपलब्ध आहेत.
यात भरीस भर म्हणून की काय कदंब महामंडळाने काल दिवाळीच्या पूर्वसंध्येला आपल्या शटल सेवेचे दर ३३ टक्क्यांनी वाढवल्याने नोकरी व अन्य कामानिमित्त रोज कदंबमधून प्रवास करणार्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले. ही कसली दिवाळीची भेट असा प्रश्‍न काही प्रवाशांनी केला.