ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण करा : युरी

0
7

डॉ. राम मनोहर लोहिया व ज्युलियांव मिनेझिस यांनी 18 जून रोजी गोवा मुक्तीच्या अंतिम लढ्याची ज्योत पेटविली. त्यानंतर गोमंतकीयांनी लढा तीव्र केला. भाजप सरकारने स्वातंत्र्य संग्रामातील मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण केले पाहिजे व स्वातंत्र्य सैनिकांचा आदर केला पाहिजे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले. काल लोहिया मैदानावर हुतात्मा स्मारक व लोहियांच्या पुतळ्यावर पुष्पचक्र वाहिल्यानंतर ते बोलत होते. त्यावेळी खासदार फ्रान्सिस सार्दिन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमीत पाटकर, उपाध्यक्ष एम. के. शेख, महिला काँग्रेस अध्यक्षा बीना नायक, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. लोहिया मैदान ऐतिहासिक असून तो दस्तावेज जतन करण्यासाठी भाजप सरकारला विसर पडला आहे. स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष गुरूदास कुंदे यांनी मागण्या केल्या आहेत. त्या मान्य कराव्यात तसेच आग्वाद व रेईश मागूश किल्ल्यांचे पावित्र्य राखावे, असे आलेमाव म्हणाले. तीन वादग्रस्त प्रकल्प रद्द करावेत व आमदारांनी गोवा विधानसभेत यावर आवाज उठवावा. आपणही लोकसभेत हा प्रश्न उपस्थित करणार असे खासदार सार्दिन यांनी सांगितले. अमीत पाटकर म्हणाले, भाजपचे केंद्र सरकार व गोव्यातील सरकार विधानसभा व लोकसभेचे जतनेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यास संधी देत नाहीत. अधिवेशनाचा कालावधी कमी केला असल्याने लोकांनाच रस्त्यावर येवून आवाज उठवावा लागेल, असे ते म्हणाले.