ऐतिहासिक स्थळांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

0
10

>> विरोधकांची सरकारवर टीका; संरक्षित स्थळे म्हणून अधिसूचित करण्याची मागणी

ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ असलेले पणजी येथील ‘आझाद मैदान’, मडगाव येथील ‘लोहिया मैदान’ व कुंकळ्ळी येथील ‘चिफ्टन्स मेमोरिअल’ ही संरक्षित स्थळे म्हणून अधिसूचित करण्याकडे सरकार दुर्लक्ष केल्याच्या प्रश्नावरून काल विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले.
लोहिया मैदान व आझाद मैदानांची दुरवस्था झालेली असून, त्याला सरकार जबाबदार असल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला. या ऐतिहासिक स्थळांवर जुगार खेळला जातो, मद्यपी तेथेच ठाण मांडून असतात, मद्याच्या बाटल्या तेथेच टाकून देतात. लोहिया मैदानावरील पुतळाही काही वर्षांपूर्वी तेथून गायब झाला होता, असे यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यानी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

यावर बोलताना पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी ही स्थळे संरक्षित स्थळे म्हणून अधिसूचित न करण्यामागील कारण सांगितले. सदर स्थळे 100 वर्षे एवढी जुनी नसल्याने ती ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची म्हणून अधिसूचित करता येत नाहीत, असे फळदेसाई म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाष्यही केले. एकदा ही स्थळे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची म्हणून अधिसूचित केली तर तेथे सभा, निषेध सभा, निदर्शने आदींचे आयोजन करता येणार नसल्याची बाब यावेळी मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.