कृषी खात्याने अनुसूचित जाती आणि जमातीमधील (एससी, एसटी) शेतकर्यांना शेतीकडे आकर्षित करण्यासाठी कृषी साधनाच्या खरेदीसाठी आर्थिक अनुदान देण्याची योजना जाहीर केली आहे.
एससी आणि एसटी समाजातील शेतकर्यांना कृषी साधनाच्या खरेदीवर अंदाजे ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. एससी समाजातील शेतकर्याला हेक्टरी १२ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. शेतकर्याला २ हेक्टर जागेतील लागवडीसाठी एका हंगामासाठी २४ हजार रुपये अनुदान मिळू शकते.
अनुसूचित जाती आणि जमातीमधील शेतकरी कमकुवत आर्थिक परिस्थितीमध्ये शेतीसाठी आवश्यक साधनांची खरेदी करू शकत नाही. परिणामी शेतीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आढळून आल्याने एससी समाजातील शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान योजना तयार करण्यात आली आहे. तसेच एसटी आणि एससी समाजातील युवकांनी कृषी क्षेत्राकडे वळविण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. शेतकर्यांना बियाणे, पीक लावणीसाठी साहित्य, कीटकनाशके, माती परीक्षण, जैव खते खरेदीसाठी अनुदान दिले जाऊ शकते. या अनुदानाचा लाभ घेणार्या एससी, एसटी समाजातील शेतकर्याच्या मालकीची शेत जमीन असली पाहिजे. शेतजमीन करार पद्धतीवर घेतलेला एससी समाजातील शेतकरी या अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेणार्या शेतकर्याने विभागीय कृषी कार्यालयात अर्ज सादर केला पाहिजे. शेतकर्याच्या बँक खात्यात अनुदान जमा केले जाणार आहे.