सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) मंगळवारी संध्याकाळी 5.30 वाजता निवडणूक रोख्यांचा (इलेक्टोरल बाँड्स) संपूर्ण तपशील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केला. निवडणूक आयोग हा संपूर्ण तपशील 15 मार्चपर्यंत आपल्या संकेतस्थळावर अपलोड करेल. त्याबाबतचे आदेश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, निवडणूक रोख्यांचा तपशील गोळा करण्यासाठी 30 जूनपर्यंतचा वेळ मागणाऱ्या एसबीआयने 24 तासांत तो आयोगाकडे कसा सोपवला याबाबत जनमानसांत आश्चर्य व्यक्त होत आहे.
निवडणूक रोख्यांची माहिती जाहीर करण्याला 30 जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारी एसबीआयची याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत 12 मार्चपर्यंत निवडणूक रोख्यांचा तपशील निवडणूक आयोगाला सादर करावा, असे आदेश दिले होते.
आता निवडणूक आयोग 15 मार्चला निवडणूक रोख्यांचा संपूर्ण तपशील संकेतस्थळावर अपलोड करेल. त्यानंतर कोणी कोणत्या पक्षासाठी किती प्रमाणात आपली झोळी खाली केली हे स्पष्ट होईल.