एसटी राजकीय आरक्षण विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनात संमत करा

0
1

>> उटा संघटनेची पत्रकार परिषदेत मागणी; मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेणार

संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात गोव्यातील एसटी राजकीय आरक्षण विधेयक संमत करावे. तसेच, राज्य पातळीवर आवश्यक असणारी याबाबतची सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून येत्या 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एसटी समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी उटा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी काल पणजीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केली.
गोव्यात गावडा, वेळीप, कुणबी समाजाला एसटी दर्जा मिळवण्यासाठी मोठी आंदोलने करावी लागली. त्यामध्ये आमचे दोन बांधव शहीद देखील झाले होते. यानंतर आम्ही एसटी समाजाला राजकीय आरक्षणात मिळण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करत आहोत; मात्र अजूनही आम्हाला घटनेनुसार आरक्षण मिळालेले नाही, असेही वेळीप यांनी सांगितले.

केंद्र सरकारने गेल्या ऑगस्ट 2024 मध्ये गोव्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण देणारे विधेयक संसदेत मांडले. यानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये एसटी आरक्षण विधेयक चर्चेला घेण्यात आले; तथापि काही कारणास्तव हे विधेयक संमत झाले नाही. आता, सध्या सुरू असणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मंजूर करून घ्यावे, अशी वेळीप यांनी केली.
एसटी समाजाच्या अन्य मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची लवकरच भेट घेतली जाणार आहे. पर्वरी येथील नियोजित आदिवासी भवन, सर्व शेतकऱ्यांना काजूसाठी हमीभाव मिळावा, तसेच उटाच्या वर्धापनदिन सभेमध्ये करण्यात आलेल्या 17 मागण्यांचा पाठपुरावा केला जाणार आहे, असे वेळीप यांनी सांगितले. यावेळी विश्वास गावडे, भालचंद्र उसगावकर, रामदास पर्वतकर, दया गावकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.