>> आयोगाची गोमेकॉला शिफारस
राज्यातील अनुसूचित जमाती वर्गासाठी राखीव जागा नियमितपणे भरण्यासाठी कर्मचाऱ्यांची स्वतंत्र निवड यादी तयार करून आवश्यक पावले उचलण्याची महत्त्वपूर्ण शिफारस गोवा अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे अध्यक्ष दीपक करमळकर यांनी यासंबंधीचा एक निवाडा देताना गोमेकॉला केली आहे.
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) कर्मचारी आवेलिंना आल्वारिस यांनी आयोगासमोर दाखल केलेली एसटी राखीव प्रवर्गातून वॉर्ड सिस्टर बढतीबाबतची याचिका निकालात काढताना आयोगाने गोमेकॉच्या डीनना 19 जानेवारी 2016 रोजी घेण्यात आलेल्या डीपीसी अहवालाचा फेरआढावा घेऊन गरज भासल्यास नवीन डीपीसी तयार करावी अशी शिफारस केली आहे. आयोगाच्या शिफारशीच्या कार्यवाहीचा कृती अहवाल तीन महिन्यांत सादर करण्याचा निर्देश दिला आहे. गोमेकॉतील स्टाफ नर्स म्हणून 8 जानेवारी 2004 रोजी आवेलिंना आल्वारिस रुजू झाल्या. गोमेकॉमध्ये अनुसूचित जमातीसाठी वॉर्ड सिस्टर हे पद कायमस्वरूपी रिक्त असताना 27 एप्रिल 2016 मध्ये त्यांची तात्पुरत्या स्वरूपात वॉर्ड सिस्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
बढती देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने जागा रिक्त असताना नावाचा विचार केला नाही, असा दावा आल्वारिस यांनी याचिकेत केला. आयोगाने आपल्या निवाड्यामध्ये न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या विविध निवाड्यांच्या आधारे, तसेच, राज्य सरकारच्या आदिवासी कल्याण खात्याने जारी केलेल्या एसटी आरक्षित बढतीबाबत परिपत्रकाच्या आधारे राखीव जागेवरील बढतीसाठी कर्मचाऱ्यांची तिसरी यादी तयार करण्याची शिफारस गोमेकॉला केली आहे.