>> गृहनिर्माण मंडळातील कथित घोटाळा
>> आप कार्यकर्त्यांची निदर्शने
>> भ्रष्टाचारविरोधी पोलिसांची कारवाई
गोवा गृहनिर्माण मंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक एल्विस गोम्स यांना आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर आठवडाभरातच सरकारने त्यांना गृहनिर्माण मंडळातील कथित जमीन घोटाळा प्रकरणी चौकशीच्या फेर्यात अडकवून कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला असून काल भ्रष्टाचार विरोधी पोलिसांनी त्यांची सुमारे तीन तास कसून जबानी घेतली. सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत त्यांची जबानी घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान, सरकारच्या या कृतीच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एसीबीच्या कार्यालयासमोर काल जोरदार निदर्शने करून सरकारविरोधात घोषणा दिल्या.
चौकशीनंतर पोलीस स्थानकातून बाहेर आल्यानंतर एल्विस गोम्स यांनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले. राजकीय सूड उगवण्यासाठी या कथित जमीन घोटाळा प्रकरणात आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. कथित घोटाळ्यात आपला कोणताच हात नसल्याचे आपण पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांकडून आपली नाहक छळवणूक होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पोलिसांनी आपणावर प्रश्नांचा भडीमार केला. पण त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे आपण योग्य ते उत्तर दिल्याचे गोम्स म्हणाले.
सदर जमीन संपादन रद्द करण्याचा प्रस्ताव योग्य होता की नाही हे आपणाला माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. मडगावजवळ ३० हजार चौ. मी. जमीन संपादित करण्यात आली होती. पण नंतर हे जमीन संपादन मागे घेण्यात आले होते. पण सदर निर्णय हा आपण गृहनिर्माण मंडळाचा व्यवस्थापकीय संचालक होण्याच्या दोन महिने अगोदरच घेण्यात आला होता. १९ मार्च २०११ रोजी सदर निर्णय घेण्यात आला होता. आपण सदर निर्णय झाल्यानंतर दोन महिन्यांनी गोवा गृहनिर्माण मंडळाचा व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यामुळे त्या निर्णयासाठी आपणाला जबाबदार धरता येणार नसल्याचे आपण भ्रष्टाचारविरोधी पोलिसांकडे जबानी देताना स्पष्ट केल्याचे गोम्स यांनी सांगितले.
आपवाल्यांची निदर्शने
दरम्यान, आपच्या मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवाराला भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून जबानीसाठी समन्स पाठवून बोलावून घेतल्याने संतप्त बनलेल्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व उमेदवारांनी यावेळी एसीबीच्या कार्यालयासमोर निदर्शने करून आपल्या नेत्याला पाठिंबा व्यक्त केला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत त्यांनी कृतीचा तीव्र निषेध केला.
राजकीय सूडबुद्धीने कारवाई : एल्विस
कथित घोटाळ्याचे आरोप एल्विस गोम्स यांनी फेटाळून लावले. आपण राजकारणात उतरल्याने व आम आदमी पार्टीसारख्या एका महत्त्वाच्या पक्षाने आपणाला गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाचा मुख्यमंत्रीपदासाठीचा उमेदवार जाहीर केलेला असल्याने आपली प्रतिमा खराब करण्यासाठी सूडबुध्दीनेच आपणावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप गोम्स यांनी केला.