जयपूर येथील एलपीजी टँकर स्फोटात गंभीर भाजलेल्या मुलीसह आणखी दोघांचा बुधवारी सवाई मान सिंग (एसएमएस) रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांतील मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे. त्यामध्ये एका माजी आयएएसचाही समावेश आहे. हा अपघात जयपूर-अजमेर महामार्गावर 20 डिसेंबर रोजी सकाळी पावणेसहाच्या सुमारास झाला होता. बुधवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास विजेता (22, रा. प्रतापगड राजस्थान) आणि सकाळी 9.30 वाजता विजेंद्र भुरीबराज (36, रा. पावता जयपूर) यांचा मृत्यू झाला. विजेता आणि विजेंद्र हे 70 टक्के भाजले होते. सवाई मानसिंग (एसएमएस) रुग्णालयाच्या बर्न वॉर्डमध्ये 16 गंभीर भाजलेल्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दोघांचेही मृतदेह एसएमएस हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. वैद्यकीय मंडळाकडून शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. त्याआधी मंगळवारी या दुर्घटनेतील 2 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये एटा उत्तरप्रदेश येथील नरेश बाबू आणि नूह हरियाणा येथील युसूफ यांचा समावेश होता.