‘एलएसी’वरील स्थिती भारताच्या नियंत्रणात

0
14

>> तवांग चकमकीनंतर ईस्टर्न कमांडच्या प्रमुखांची माहिती

तवांगमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर ईस्टर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल आर. पी. कलिता यांनी शुक्रवारी महत्त्वपूर्ण माहिती दिली. पीएलएने एलएसी ओलांडली, परिणामी त्याविरोधात दोन्ही बाजूंचे सैनिक आमने-सामने आले. त्यात काही सैनिक जखमी झाले. हा प्रश्न स्थानिक पातळीवर सोडवला गेला आहे. या संदर्भात बुमला येथे फ्लॅग मिटिंग झाली असून, आता परिस्थिती नियंत्रणात आहे, असे कलिता यांनी सांगितले.

लेफ्टनंट जनरल आर. पी. कलिता कोलकाता येथे विजय दिवसाच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त पुष्पहार अर्पण समारंभानंतर माध्यमांशी बोलत होते. ९ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील यांगत्से येथे चीन आणि भारताचे सैनिक आमनेसामने आले होते. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या या चकमकीत अनेक जवान जखमी झाले. त्यानंतर दोन्ही लष्कराच्या कमांडर्सनी फ्लॅग मिटिंग घेऊन परिस्थिती हाताळली. त्यानंतर दोन्ही देशांचे सैनिक मागे हटले.

लष्करी जवान या नात्याने आपण आपल्या देशाचे रक्षण करण्यास सदैव तयार असतो. शांतता असो वा संघर्ष, बाह्य किंवा अंतर्गत धोक्यांपासून देशाची प्रादेशिक अखंडता सुनिश्चित करणे, हे प्राथमिक कार्य आहे. आम्ही सर्व परिस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितींसाठी तयार आहोत, असे कलिता यांनी सांगितले.
या घटनेबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. दोन्ही बाजूंच्या जवानांना किरकोळ दुखापत झाली असली तरी, कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नका. उत्तरेकडील सीमेवरील सीमावर्ती भागात आमचे नियंत्रण आहे, असा खुलासाही त्यांनी केला.