मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने एलएलबी प्रवेश घोटाळा प्रकरणात सोमवार दि. 31 जुलैपर्यंत स्थिती कायम ठेवण्याचा काल दिला. विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे त्यांच्या वर्गात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. बीए एलएलबी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया रद्दबातल करण्याच्या गोवा विद्यापीठाच्या (जीयू) निर्णयाविरोधात व्ही. एम. साळगावकर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला. बीए एलएलबी प्रवेश परीक्षेत पक्षपात आणि हेराफेरीच्या आरोपांमध्ये चौकशी समितीला सत्यता आढळल्यानंतर गोवा विद्यापीठाने मंगळवारी एक अधिसूचना जारी करून गोवा कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (जी-सीएलएटी) वर आधारित उमेदवारांना कायदा महाविद्यालयात दिलेले प्रवेश मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रवेश परीक्षा रद्द ठरवण्यात आल्याने गोवा विद्यापीठाने 6 ऑगस्ट रोजी फेरपरीक्षा जाहीर केली आहे.