सरकारकडून एलईडी आणि बुल ट्रॅव्हलिंग पद्धतीने करण्यात येणार्या मासेमारीवर कारवाईसाठी येत्या पंधरा दिवसात नियम निश्चित करून कारवाई केली जाणार आहेत, अशी माहिती मच्छीमार मंत्री फिलीप नेरी रॉड्रीगीस यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
राज्यात एलईडी आणि बुल ट्रॅव्हलिंग पद्धतीने मासेमारी केली जात असल्याची स्थानिक मच्छीमारांकडून तक्रार केली जात आहे. राज्य सरकारने एलईडी पद्धतीच्या मच्छीमारीवर बंदीचा आदेश जारी केला आहे. परंतु, गेली चार वर्षे आदेशाची कार्यवाही करण्यात आलेली नाही. गोंयच्या रापणकारांचो एकवट या संघटनेच्या एका शिष्टमंडळाने मच्छीमार मंत्री रॉड्रीगीस यांची भेट घेऊन एलईडी व बुल ट्रॅव्हलिंग पद्धतीच्या मासेमारीवर कारवाईची मागणी केली.
मच्छीमारी खात्याने एलईडी पद्धतीवर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. एलईडी पद्धतीच्या मासेमारीवर कारवाईसाठी राज्य सरकारने नियम तयार केलेले नसल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही महिन्यांपूर्वी एलईडी पद्धतीच्या मासेमारीवर कारवाईसाठी नियम तयार करण्याची सूचना मच्छीमारी खात्याला केली होती. तथापि, अद्यापपर्यंत कारवाईसाठी नियम तयार करण्यात यश प्राप्त झाले नाही.
मच्छिमारी खात्याकडून एलईडी पद्धतीने मासेमारी करणार्यावर कारवाईसाठी किनारी पोलीस, तटरक्षक दल, बंदर कप्तान खात्याची मदत घेतली जाणार आहे. एलईडी पद्धतीने मच्छीमारी करणार्या बोटी ताब्यात घेण्यासाठी मच्छीमारी खात्याकडे आवश्यक यंत्रसामग्री नाही. एलईडी व बुल ट्रॅव्हलिंगद्वारे मच्छीमारी करणार्या मोठ्या बोटीवर कारवाईला प्राधान्य दिले जाणार आहे, असे मच्छीमार मंत्री रॉड्रीगीस यांनी सांगितले.