>> विरोधकांसह सत्ताधारी आमदारांकडूनही आरोपांच्या फैरी; चौकशीची मागणी
राज्यातील वीजपुरवठ्यात सुधारणा करण्याच्या हेतूने घातलेल्या ‘एरियल बंच केबल’च्या कामांत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. या प्रकरणी सभागृह समितीकडून चौकशी करण्याची गरज आहे, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी काल विधानसभेत केली, तर एरियल बंच केबल हा 145 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपचे आमदार मायकल लोबो आणि संकल्प आमोणकर यांनी केला. दरम्यान, एरियल बंच केबल प्रकल्पावर 145 कोटी रुपये खर्च झाले होते; मात्र हा घोटाळा आहे की नाही, हे आपण सांगू शकत नाही. तसेच या प्रकरणाची चौकशी करावी की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. आपण कोणत्याही चौकशीस तयार आहे, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
राज्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या विषयावरून आमदार विजय सरदेसाई, ॲड. कार्लुस फेरेरा आणि गणेश गावकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. आमदारांनी या लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून पावसाळ्यात वरच्यावर खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा प्रश्न मांडून तो त्वरित सोडविण्याची मागणी केली. या चर्चेत त्यांच्यासह संकल्प आमोणकर, मायकल लोबो, दिगंबर कामत, व्हेन्झी व्हिएगस, क्रूज सिल्वा, दिव्या राणे, विरेश बोरकर, डॉ. चंद्रकांत शेट्ये, रुडॉल्फ फर्नांडिस, उल्हास तुयेकर, डिलायला लोबो, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सहभाग घेतला.
एरियल बंच केबल प्रकल्प म्हणजे एक घोटाळा आहे. हा घोटाळा झाला तेव्हा जे कोणी वीजमंत्री होते, मुख्य अभियंता होते, त्यांची नावे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत उघड करावी, अशी मागणी संकल्प आमोणकर यांनी केली. एरियल बंच केबल हा 145 कोटी रुपयांचा घोटाळा असून, त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मायकल लोबो यांनी केली. मागील विधानसभेत या घोटाळ्याचा विषय मांडला होता, त्यावेळी सरकारने चौकशीचे आश्वासन दिले होते, असेही लोबो म्हणाले.
पावसाळ्यातील वादळी जोरदार वारा, जोरदार पाऊस यामुळे झाडे, झाड्यांच्या फाद्यां वीजवाहिन्यांवर कोसळत असल्याने वीज तारा तुटून पडत आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात विविध मतदारसंघांतील वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. वीज खात्याकडून पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्या, वीज सामुग्रीची देखभालीचे काम हाती घेतले जाते; मात्र झाडे तुटून पडत असल्याने वीज तारा व वीज खांबांची नासधूस होत असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.
वीजमंत्री काय म्हणाले?
वीजपुरवठ्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्यभरात ‘बंच केबल्स’ घालण्यात आले होते; पण ‘बंच केबल्स’ सर्व ठिकाणी निकामी ठरले.
सुमारे 761.66 किलोमीटर बंच केबल घालण्यात आली असून, त्यातील केवळ 498 किलो मीटर बंच केबल विद्युतभारित करण्यात आली.
पावसाच्या दिवसात या बंच केबलमध्ये विविध कारणांमुळे तांत्रिक दोष निर्माण होत आहे. बंच केबलमधील दोष शोधण्यास विलंब होत असल्याने वीज पुरवठा वेळेवर सुरू करण्यात अडचणी येतात.
3.8 कोटी खर्चून फॉल्ट डिटेक्शन व्हॅनची खरेदी करणार
वीज केबलमधील दोष शोधून काढून खंडित वीजपुरवठा त्वरित पूर्ववत करण्यासाठी अंदाजे 3.8 कोटी रुपये खर्च करून फॉल्ट डिटेक्शन व्हॅन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
प्रत्येक मतदारसंघात भूमिगत वीजवाहिन्या : वीजमंत्री
राज्यातील प्रत्येक मतदारसंघात 40 कोटी रुपये खर्च करून भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल विधानसभेत सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासाला केपे मतदारसंघाचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. सध्या भूमिगत वीजवाहिन्यांसाठी 150 कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला केपे मतदारसंघाचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी आपल्या मतदारसंघातील खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित करून हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार काय करणार आहे, असा सवाल वीजमंत्री ढवळीकर यांना केला होता. त्यावेळी उत्तर देताना ढवळीकर यांनी वरील माहिती दिली.
यावेळी केपे मतदारसंघात वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित करताना डिकॉस्टा यांनी गेल्या 3 वर्षांच्या काळात केपे मतदारसंघात तब्बल 322 वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.या वीजपुरवठ्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकार कोणती उपाय योजना करणार आहे, असा प्रश्नही डिकॉस्टा यांनी यावेळी केला.
यावर उत्तर देताना केपे मतदारसंघात भूमिगत वीजवाहिन्या घालण्यासाठी लवकरच 20 कोटी रुपयांची निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती ढवळीकर यांनी दिली; मात्र भूमिगत वीजवाहिन्या घालण्यास पावसाळ्यात परवानगी मिळत नाही. त्यामुळे हे काम सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाळ्ळी-पाटे, आगोंदा-खोल, असोळणा-बेतूल येथून केपे मतदारसंघाला होणाऱ्या वीजपुरवठ्यात सुधारणा घडवून आणण्यात येणार आहे. संपूर्ण गोव्याबरोबरच केपेतील जुने वीज कंडक्टर्स बदलण्यात येणार असल्याची माहिती ढवळीकर यांनी दिली.