‘एमएसपी’च्या कायदेशीर हमीसाठी सरकारवर दबाव आणू

0
12

>> विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन

किमान आधारभूत किमतीला (एमएसपी) कायदेशीर हमी देण्यासाठी विरोधक म्हणून आम्ही केंद्र सरकारवर दबाव आणू, असे आश्वासन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल शेतकऱ्यांना दिले. राहुल गांधी यांनी काल दिल्लीत किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली 12 शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम्ही काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात किमान आधारभूत किमतीच्या कायदेशीर हमीचा उल्लेख केला होता. आम्ही या संदर्भात अभ्यास केला आहे. त्यामुळे किमान आधारभूत किमतींसाठी कायदेशीर हमी लागू केली जाऊ शकते, हे मी ठामपणे सांगू शकतो, असे राहुल गांधी म्हणाले. या संदर्भात आम्ही लवकरच इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक घेणार असून, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली जाईल. त्यानंतर आम्ही एमएसपीच्या कायदेशीर हमीसाठी सरकारवर दाबाव आणू, असेही ते म्हणाले.

दरम्यान, या बैठकीपूर्वी शेतकऱ्यांना संसदेत प्रवेश न दिल्याने चांगलाच गोंधळ उडाल्याचे बघायला मिळाले. यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकावर जोरदार टीका केली. मोदी सरकार आम्हाला शेतकऱ्यांना भेटू देत नाही, असा आरोप त्यांनी केला. आम्ही काही शेतकऱ्यांना भेटण्यासाठी संसदेत बोलवले होते; मात्र त्यांना आत प्रवेश दिला नाही. ते शेतकरी असल्याने त्यांना संसदेत येत येऊ देत नसावे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.