दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्स याने आपल्या सार्वकालिक आयपीएल इलेव्हन संघाचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनी याच्याकडे सोपवले आहे. चौथ्या क्रमांकासाठी एका खेळाडूची निवड करणे कठीण गेल्याने एबीने स्वतःसह केन विल्यमसन व स्टीव स्मिथ यालासुद्धा संघात सामावून घेतले आहे. क्रिकेटसंबंधी माहिती देणारे संकेतस्थळ असलेल्या ‘क्रिकबझ’ वर समालोचक हर्षा भोगले यांच्याशी बोलताना डीव्हिलियर्सने संघ जाहीर केला.
डीव्हिलियर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघातील आपला माजी सहकारी व भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग व मुंबई इंडियन्सचा विद्यमान कप्तान रोहित शर्मा यांची सलामीच्या जागेसाठी निवड केली आहे. आपला रॉयल चॅलेंजर्स संघातील संघसाथी व टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला तिसरा क्रमांक या संघात मिळाला आहे.
सध्याच्या काळातील सर्वांत यशस्वी अष्टपैलू बेन स्टोक्स याला पाचवे तर धोनीला सहावे स्थान देण्यात आले आहे. यानंतर भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा व अफगाणिस्तानचा जादुई लेगस्पिनर राशिद खान यांचा क्रमाक लागतो. भुवनेश्वर कुमार, कगिसो रबाडा व जसप्रीत बुमराह हे ‘एबी’च्या संघातील तीन स्पेशलिस्ट जलदगती गोलंदाज आहेत.
एबी डीव्हिलियर्सचा सार्वकालिक संघ ः वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, विराट कोहली, केन विल्यमसन-स्मिथ-डीव्हिलियर्स, बेन स्टोक्स, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, कगिसो रबाडा व जसप्रीत बुमराह.