फुटबॉल क्लब ऑफ बार्देशने तीन गोलांच्या पिछाडीनंतर दमदार पुनरागमन करताना स्पोर्टिंग क्लब ऑफ गोवाला ३-३ असे बरोबरीत रोखत धुळेर स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या जीएफएच्या गोवा प्रो-लीग सामन्यात गुण विभागून घेतले.
बरोबरीमुळे स्पोर्टिंग क्लब दी गोवाचे ११ तर एफसी बार्देशचे ७ गुण झाले आहेत.
स्पोर्टिंग क्लब दी गोवाने आक्रमक खेळ करताना ३ -० अशी दमदार आघाडी घेतली होती. फ्लेमिंग ऑरेंजचा नवीन करारबद्ध नायजेरियन खेळाडू फिलिप ओडोग्वूने २४व्या मिनिटाला मार्कुस मस्कारेन्हासच्या अचूक पासवर प्रतिस्पर्धी गोलरक्षक ऍलिस्टन फर्नांडिसला चकवित १ -० अशी आघाडी मिळविली. पहिल्या सत्रात त्यांनी आपली आघाडी राखली.
दुसर्या सत्रातही आक्रमक सुरुवात करताना ५४व्या मिनिटाला उजव्या विंगेतून व्हिक्टारिनो फर्नांडिसकडून मिळालेल्या क्रॉसवर एफसी बार्देशच्या कायतान व्हिएगसने चेंडू क्लिअर करण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या गोलपोस्टमध्ये मारल्याने स्वयंगोलाची नोंद झाली (२-०). तर ६६व्या मिनिटाला ग्लेन मार्टिन्सने ३० यार्डावरून घेतलेला जोरकस शूटवर प्रतिस्पर्धी गोलरक्षक ऍलिस्टन काहीच करू शकला नाही व चेंडू थेट जाळीत जाऊन विसावल्याने स्पोर्टिंगने ३ -० अशी मजबूत आघाडी मिळविली.
तीन गोलांच्या पिछाडीनंतर एफसी बार्देशने दमदार पुनरागमन करताना स्पोर्टिंगच्या अंडर -२० गोलरक्षकाच्या गचाळ गोलरक्षाचा लाभ उठवित ३ -३ अशी बरोबरी साधण्यात यश मिळविले. चतुर नाईकने ७१व्या मिनिटाला एफसी बार्देशीची पिछाडी ३-१ अशी भरून काढली. ८५व्या मिनिटाला सोदिक इब्राहिमने स्वयंगोल नोंदविल्याने पिछाडी ३-२ अशी कमी झाली. तर इनासिओ कुलासोने ९३व्या मिनिटाला गोल नोंदवित एफसी बार्देशला ३-३ अशी बरोबरी साधून देताना गुण विभागून घेतले.