इंडियन सुपर लीग
बहुचर्चित इंडियन सुपर लीगचा गोव्यातील शुभारंभी सामना आज येथील नेहरू स्टेडियमवर स्थानिक एफसी गोवा आणि चेन्नईन एफसी या तूल्यबळ प्रतिस्पर्ध्यांत होईल.
ब्राझिलचे दिग्गज फुटबॉलपटू झिको यांच्या मागर्ंदर्शनाखालील यजमान संघाने अपेक्षित कामगिरी बजावल्यास गोमंतकीय फुटबॉलप्रेमींना उच्चस्तरीय फुटबॉलचा आस्वाद लाभेल.
जागतिक दजार्ंच्या खेळाडूंच्या खांद्याला खांदा भिडवून खेळण्याची संधी उभय संघातील भारतीय खेळाडूंना मिळणार असून ज्येष्ठ-श्रेष्ठ खेळाडूंच्या अनुभवाचा निश्चित फायदा होईल.फ्रान्सचा माजी विश्व चषक स्टार रॉबर्ट पीरिस, झेकोस्लोव्हाकियाचे जॅन सेडा आणि मिरोस्लाव स्लेपिका आणि ब्राझिलचा आंद्रे सांतोस असे दिग्गज खेळाडू एफसी संघात असून अनुभवी झिको यांच्या मार्गदर्शनाखालील स्थानिक संघ आपली आयएसएल मोहीमेचा प्रारंभ धडाक्यात करण्यास सज्ज असेल.
फ्रान्सचे ग्रेगरी अर्नोलिन आणि युनेस बेंगेलौन तसेच ब्रुणो पिन्हेरो, मिगेल परेरा आणि एडगर मार्सेलिनो हे पोर्तुगिज त्रिकुटाकडूनही गोवा फ्रँचाइजच्या यशात महत्वपूर्ण योगदानाची अपेक्षा आहे.
चेन्नईन एफसीतही जागतिक दजार्ंचे स्टार फुटबॉलपटू आहे. २००६मधील विश्व चषक विजेत्या इटालीचा मार्को मेटाराझ्झी खेळाडू आणि व्यवस्थापक अशी दुहेरी भूमिका बजावणार आहे. ब्राझिलचा विश्व चषक खेळाडू एलानोे, मँचेस्टर युनायटेडचा बचावपटू मिकाएल सिल्वेस्टर, कोलंबियन स्ट्रायकर जॉन स्टिवन मेन्डोझा, जायरो कार्वाझल, फ्रान्सचा गोलरक्षक जेनारो ब्रासिगलियानो आणि बेर्नार्ड मेंडी, सर्बियाचा बोजन जोर्डजिक, एदुआर्दो सिल्वा आणि क्रिस्तियन गोन्झालेझ आदि विदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. गौरमंगी सिंग, जेजे लालपेखलुआ, हरमनज्योत खाब्रा, डेन्सन देवदास, खेलंंबा मीत्तेई, एन. पी. प्रदीप, जेसन वालिस आणि अँथनी बार्बेझ या राष्ट्रीय खेळाडूंचा चेन्नईन संघात समावेश आहे.
आपल्या आक्रमक शैलीला खेळाडूंकडून उत्तम प्रतिसाद लाभल्याबद्दल एफसी गोवाचे प्रशिक्षक झिको यांनी समाधान व्यक्तविले.
गेल्या दिडेक महिन्याच्या सरावात खेळाडूंत उत्तम ताळमेळ साधला आहे. मित्रत्वाच्या सामन्यात उत्तम कामगिरीत विजय मिळविले. पण मित्रत्वाचे सामने आणि स्पर्धात्मक समाने वेगळे असतात आणि शुभारंभी सामन्यासाठी आम्ही खास रणनीती आखलेली असून विजयाचे पूर्ण गूण मिळविण्यास उत्सुक आहोत, असे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
एफसी गोवा संघातील धेंपो स्पोर्ट्स क्लबचे युवा खेळाडू होलिचरण नार्झारी, पीटर कावार्ंल्यो आणि रॉविल्सन रॉड्रिक्स यांनी प्रशिक्षक झिको यांना विशेष प्रभावीत केले आहे. झेक गोलरक्षक जीन सेडाने आपला ठसा उमटविलेला असून देवव्रत रॉय आणि पीटर कावार्ंल्यो ‘विंग्ज’मध्ये असतील आणि त्यांना नार्झारी आणि गॅब्रिएल फर्नांडिसची साथ असेल. ‘मार्की प्लेयर’ फ्रान्सचा विश्व चषक विजेता, रॉबर्ट पीरिस आक्रमक मध्यरक्षकाच्या भूमिकेत आणि पोर्तुगीज स्ट्रायकर मिगेल हेर्लैन आघाडीत असेल. ग्रेगरी अर्नोलिन बचावफळीत अभेद्यपणे ठाकेल. नायजेरियन स्ट्रायकर रँटी मार्टिन्स, ऑस्ट्रेलियन स्ट्रायकर टोल्गे ओझ्बी आणि अफगाणिस्तानचा हरून आमिरी यांचा भारतीय फुटबॉलमधील अनुभवही बहुमूल्य ठरेल. ब्राझिलचे २४ आंतरराष्ट्रीय सामान्यात प्रतिनिधीत्व केलेला बचावपटू तथा आक्रमक मध्यरक्षक म्हणूनही माहीर असलेल्या आंद्रे सांतोसची उपस्थितीही जमेची बाब ठरावी.
फ्रेंच बचावपटू ग्रेगरी अर्नोलिन आणि झेक आघाडीवीर मिरोस्वाल स्लेपिका सरावा दरम्यान जायबंदी झाले आहेत. क्लिफर्ड मिरांडाही स्नायुदुखीने त्रस्त आहे.
एफसी गोवाने तिन्ही सराव सामने जिंकले असले तरी वास्कोचा बचाव भेदण्यात बराच संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे मॅटेराझ्झी आणि मिकाएल सिल्वेस्टरच्या अधिपत्याखालील चेन्नईनचा भक्कम बचाव भेदण्यासाठी खास डावपेच आखावे लागतील. ब्रासिगिलानो चेन्नईच्या गोलरिंगणात ठामपणे ठाकेल. पीएसजीतर्फे २५०हून अधिक सामने खेळलेला बेर्नार्ंड मेंडी आणि फ्रान्सतर्फे चार आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला हुल सिटी, कोलंबियाचा माजी आंतरराष्ट्रीय जैरो स्वारेझ, गौरमंगी बचावफळीत असतील. मॅचेस्टर युनायटेडचा माजी मध्यरक्षक बोजन जोर्डजिक आणि क्रिस्तियानो हिदाल्गो मधल्याफळीत तर बलवंत सिंह आणि जेजे लालपेखलुआ आघाडीत असतील.