पिरीसचा पेनल्टीवर निर्णायक गोल
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेस येत्या १२ ऑक्टोबरपासून सुरुवात होत असून तत्पूर्वी खेळविण्यात आलेल्या तिन्ही मित्रत्वाच्या लढतीत आकर्षक खेळ करीत एफसी गोवाने विजय नोंदविले. काल फातोर्ड्याच्या पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या स्पर्धापूर्व तिसर्या मित्रत्वाच्या सामन्यात वास्को स्पोर्ट्स क्लबवर १-० अशी मात करीत आपण स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. यापूर्वी झालेले सेझा फुटबॉल अकादमी आणि भारतीय अंडर-१९ संघावरही त्यांनी आकर्षक विजय मिळविले होते.
काल झालेल्या सामन्यात दोन्ही संघ मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीत होते. स्टार खेळाड रॉबर्ट पिरीसच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या या सामन्यात गोवा एफसीच्या खेळाडूंनी सुरेख चाली रचल्या होत्या. परंतु पहिल्या सत्रात त्यांना जाळीचा वेध घेता आला नाही.
दुसर्या सत्रात एफसी गोवाने आक्रमक खेळ करीत एकमेव विजयी गोल नोंदवित तिन्ही मित्रत्वाच्या सामन्यात अपराजित राहण्याची कामगिरी केली. ५८व्या मिनिटाला रॉबर्ट पिरीसला वास्कोच्या खेळाडूने डी कक्षेत धोकादायकरीत्या खाली पाडल्याने पंचांनी एफसी गोवाला पेनल्टी बहाल केली. त्यावर कोणतीही चूक न करता गोल नोंदवित संघाला विजय मिळवून देतानाच रॉबर्ट पिरीसने एफसी गोवातर्फे आपले खाते खोलले.
या विजयानंतर बोलताना व्यवस्थापक तथा मुख्य प्रशिक्षक झिको यांनी सांगितले की, वास्को स्पोर्ट्स क्लबने चांगला खेळ केला. आम्हाला काही संधी मिळाल्या होत्या, परंतु आम्ही त्याचे गोलमध्ये रूपांतर करू शकलो नाही. रँटी मार्टिन्स आणि नारायण दास यांच्या समावेशामुळे संघ चांगला आकार घेत आहे, असे झिको म्हणाले.
संघाचे सहमालक असलेले श्री. श्रीनिवास धेंपो यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, एफसी गोवाने खेळावर बरेच नियंत्रण मिळविले होते. संघ तंदुरस्त दिसत आहे. आम्ही लीगसाठी सज्ज दिसत आहोत, असे ते श्री. धेंपो म्हणाले.