ऑस्ट्रेलियन स्ट्रायकर टोल्गे ऑझ्बेने सामन्याच्या अंतिम क्षणात नोंदविलेल्या प्रेक्षणीय गोलाच्या जोरावर एफसी गोवा संघाने दिल्ली डायनामोज एफसीवर २-१ अशी मात करीत हीरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली.
दिल्ली डायनामोजतर्फे मॅड्स जंकरने ७व्या मिनिटाला आघाडीचा गोल नोंदविला होता. तर शेख जेवेल राजाने ७२व्या मिनिटाला एफसी गोवाला बरोबरी साधून दिली होती. तर सामन्याच्या अंतिम क्षणात राखीव खेळाडू टोग्ले ऑझ्बेने एफसी गोवाच्या पहिल्या विजायावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदविला. स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेल्या दिल्ली डायनामोज संघाचा हा पहिला पराभव ठरला.या विजयामुळे एफसी गोवाचे पाच सामन्यातून १ विजय, एक बरोबरी आणि ३ पराभवांसह ४ गुण झाले असून ते गुणतक्त्यात सहाव्या स्थानी पोहोचलचे. तर दिल्ली डायनामोज संघ ५ सामन्यांतून ६ गुणांवर राहिला.
एफसी गोवाचे प्रशिक्षक झिको यांनी कालच्या सामन्यात तीन बदल करताना मंदार राव देसाई, रोमीओ फर्नांडिस आणि शेख ज्वेल राजा यांना पहिल्या अकरात मैदानावर उतरविले.
आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या एफसी गोवाने काल आक्रमक सुरुवात केली. परंतु स्ट्रायकर मिरोस्लॅव स्लेपिकाने काही संधी गमावल्या.
सामन्यात पहिली आघाडी घेतली ती दिल्ली डायनामोज संघाने. सामन्याच्या प्रारंभीच ७व्या मिनिटाला ब्रुनो हेर्रेरो आरियसकडून गोलपोस्टाच्या तोंडावर दिलेल्या अचूक क्रॉसवर मॅड्स जंकरने मिळालेल्या संधीवर दिल्लीला आघाडीवर नेणारा हा गोल नोंदविला. दरम्यान, स्टिजीन हुबेनशी झालेल्या टक्करीत आंद्रे सांतोस जखमी झाल्याने एफसी गोवाला जोरदार झटका बसला. परंतु एफसी गोवाने त्यातून सावरताना दिल्ली डायनामोज संघावर जोरदार हल्ले चढवित काही चांगल्या संधी निर्माण केल्या होत्या. परंतु त्यांना त्यांचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. मिरास्लोल स्लेपिकाने घेतलेल्या हेडरवरील चेंडू प्रतिस्पर्धी बचावपटूला लागून बाहेर गेला. तर रोमीओ फर्नांडिसकडून मिळालेल्या पासवर जेवेल राजाने खुली संधी गमावली. पहिल्या सत्रात दिल्लीने आपली १-० आघाडी राखली.
दुसर्या सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक खेळावर भर दिला होता. त्यात एफसी गोवाने चांल्या चाली रचल्या होत्या. परंतु जेवेल राजा, रोमीओ फर्नांडिस आणि मंदार राव देसाई यांनी गोलसंधी गमावल्या.
अखेर ७२व्या मिनिटाला एफसी गोवाने बरोबरी साधण्यात यश मिळविले. डाव्या विंगेतून मंदर राव देसाईने चेंडू रोमीओ फर्नांडिसकडे क्रॉस केला आणि रोमीओने हेडरद्वारे गोलपोस्टाच्या तोंडावर असलेल्या जेवेल राजाकडे पास केला. जेवेल राजाने कोणतीही चूक न करता चेंडूला हेडरद्वारेच दिल्लीच्या गोलपोस्टच्या उजव्या बाजूला जाळीची दिशा दाखविली. बरोबरीच्या गोलनंतर एफसी गोवाने खेळावर वर्चस्व राखताना दिल्लीवर हल्ले चढविले. त्यात अखेर त्यांना ९०व्या मिनिटाला यश आले. मिरास्लोव स्लेपिकाकडून मिळालेल्या पासवर स्ट्रायकर ऑझेने छातीवर चेंडू नियंत्रित करीत समोर येणार्या दिल्लीच्या गोलरक्षकाला चकवित डाव्या पायाच्या फटक्याद्वारे गोलपोस्टची दिशा दाखवित एफसी गोवाच्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदवित उपस्थित स्थानिक फुटबॉलप्रेमींना जल्लोषाची संधी दिली.