इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) सहाव्या मोसमात एफसी गोवाने आघाडी घेतली. मुंबई फुटबॉल एरीनावर सहा गोलांचा पाऊस पडलेल्या लढतीत पूर्वार्धातील दोन गोलांच्या आघाडीनंतर बरोबरी होऊनही गोव्याने आणखी दोन गोल करीत पारडे फिरविले.
गोव्याचा हा ४ सामन्यांतील दुसरा विजय आहे. दोन बरोबरींसह त्यांनी अपराजित कामगिरी राखली आहे. त्यांचे ८ गुण झाले. नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचेही ८ गुण आहेत. यात गोव्याचा ५ (१०-५) असा गोलफरक नॉर्थईस्टच्या २ (५-३) पेक्षा सरस ठरला. यामुळे गोव्याला आघाडी मिळाली. जमशेदपूर एफसीचे ३ सामन्यांतून ७, तर एटीकेचे ३ सामन्यांतून ६ गुण आहेत.
लेनी रॉड्रीग्ज आणि स्पेनचा हुकमी स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास यांच्या गोलमुळे गोव्याने मध्यंतरास २-० अशी चांगली आघाडी घेतली होती, पण मुंबईने सहा मिनिटांत दोन गोल करीत दुसर्या सत्रात प्रतिआक्रमण रचले. त्यानंतर मात्र गोव्याच्या धडाक्यासमोर मुंबईला निरुत्तर व्हावे लागले. ह्युगो बुमूस आणि कार्लोस पेना यांनी गोल करीत गोव्याला निर्णायक विजयाचे तीन गुण मिळवून दिले.
सर्जिओ लॉबेरा यांच्या संघाने सेट पीसेसवरील सफाई साध्य केली, जी त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरली. दुसरीकडे जोर्गे कोस्टा यांच्या मुंबईला ४ सामन्यांत दुसरा पराभव पत्करावा लागला. एक विजय, एका बरोबरीसह त्यांचे ४ गुण व पाचवे स्थान कायम राहिले.
खाते उघडण्याची शर्यत गोव्याने जिंकली. लेनीने हा गोल केला. त्यावेळी मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंग पूर्णपणे चकला. मध्य फळीतील ब्रँडन फर्नांडीसने त्याला पास दिला.
पूर्वार्धातील अखेरच्या मिनिटाला अखेरच्या मिनिटाला गोव्याने आघाडी वाढविली. उजवीकडून बुमूसने चाल रचत बचाव भेदला. त्याचा पास सेरीटॉन फर्नांडीसने कोरोमीनासकडे पाठविला. कोरोमीनासने मग चेंडूवर नियंत्रण मिळवित लक्ष्य साधले. त्यावेळी अमरींदरने हताशपणे डोके हलविले.
मुंबईने उत्तरार्धाच्या प्रारंभी बरोबरी साधली. ४९व्या मिनिटाला महंमद लार्बीने डावीकडून आगेकूच करीत ही चाल रचली. गोलुईने उडी मारत हेडींग केले. त्यावेळी सेरीटॉन प्रयत्न करूनही चेंडू रोखू शकला नाही. त्याचवेळी गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ हा सुद्धा चकला.
सहा मिनिटांत मुंबईने बरोबरी साधली. बिपीन सिंगने मारलेला चेंडू पेनल्टी क्षेत्रात थोपविला गेला, पण तो आपल्या दिशेने येताच सौविकने चपळाईने नेटच्या डाव्या कोपर्यात चेंडू मारला. गोव्याला चार मिनिटांनी फ्री किक मिळाली. त्यावर डावीकडून अहमद जाहौहने डावीकडे मुर्तडा फॉलपाशी चेंडू मारला. फॉलने हेडिंगवर बुमूससाठी संधी निर्माण केली, जी बुमूसने हेडिंगवरच साधली. एक मिनीट बाकी असताना फ्री किकवर बदली खेळाडू एदू बेदीयाने मारलेला चेंडू लयबद्ध धाव घेत पेनाने नेटमध्ये घालविला.
गोव्याने लौकीकानुसार वेगवान सुरवात केली. तिसर्याच मिनिटाला गोव्याने प्रयत्न केला. बचावपटू कार्लोस पेनाने डावीकडून आगेकूच करीत पेनल्टी क्षेत्रात चेंडू मारला, पण तेथे कुणीच सहकारी योग्य स्थितीत नव्हता. पुढच्याच मिनिटाला मुंबईच्या महंमद लार्बीने प्रतिस्पर्धी बचाव फळीच्या वरून चेंडू मारला. तो छातीवर नियंत्रित करीत मध्यरक्षक बिपीन सिंगने मैदानालगत पेनल्टी क्षेत्रात फटका मारला, पण चेंडू अडविला गेला.
सातव्या मिनिटाला लेनीने डावीकडे पेनल्टी क्षेत्रालगत लार्बीला पाडले. त्यामुळे मिळालेल्या कॉर्नरवर चेंडूपाशी अमीने चेर्मिटी आणि लार्बी हे दोघे होते. लार्बीने डाव्या पायाने चेंडू मारला, पण तो नेटवरून गेला. गोव्याच्या अहमद जाहौहला ११व्या मिनिटाला डावीकडे पेनल्टी क्षेत्रात मुंबईचा मध्यरक्षक रेनीयर फर्नांडिसने पाडले. त्यावेळी गोव्याने पेनल्टीचे अपील केले, जे पंच उमेश बोरा यांनी फेटाळून लावले.
चार मिनिटांनी रेनीयरने दोन बचावपटूंना चकवून आगेकूच करीत बिपीनला अप्रतिम पास दिला होता. बिपीन मात्र पुरेशा ताकदीने फटका मारू शकला नाही. १६व्या मिनिटाला गोव्याचा गोलरक्षक याने ढिसाळ खेळानंतर स्वतःला वेळीच सावरले. पुढच्याच मिनिटाला फेरॅन कोरोमीनास याने अहमद जाहौहला पास दिला. सुमारे २५ यार्डवरून अहमदने फटका मारला, पण मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याने चेंडू असमान उसळल्यानंतरही थोपविला.
निकाल
मुंबई सिटी एफसी ः २ (सार्थक गोलुई ४९, सौविक चक्रवर्ती ५५) पराभूत विरुद्ध
एफसी गोवा ः ४ (लेनी रॉड्रीग्ज २७, फेरॅन कोरोमीनास ४५, ह्युगो बुमूस ५९, कार्लोस पेना ८९)