‘एप्रिल-फूल’

0
653
  • मीना समुद्र

 

लोकांना खर्‍याच वाटतील अशा तर्‍हेने गोष्टी सांगून वा करून त्यांची फसवणूक करणे आणि फसलेल्यांची खिल्ली उडवणे, त्यांना खिजवणे, अगदी साध्या साध्या फालतू वाटतील अशा गोष्टीत त्यांना मूर्ख बनवून स्वतः मजा घेणे असे या ‘मूर्ख दिवसा’चे साधारण स्वरूप असते.

 

बरोब्बर तारखेप्रमाणं फुलणारं एक फूल असतं. ते कधी कोमेजत नाही. महिनाभर फुलतच राहातं. पाकळ्यापाकळ्यांनी उमलत त्याचा आगळाच सुगंध देत राहतं. त्याचं नाव आहे- एप्रिल-फूल. १ एप्रिल ही त्याची फुलण्याची तारीख. अगदी जगभर ठरलेली. मग कुठे अर्धा दिवस, कुठे एक तर कुठे दोन दिवस ते फुलून राहतं आणि मग त्याचा तो विचित्र गंध महिनाभर मनात दरवळत राहातो तो अनेक आठवणींच्या रूपाने- आपल्या घरी ते कसं फुललं ते सांगणार्‍या त्या सार्‍या आठवणी, आणि थोडंसं सावध करणारा त्याचा तो गंध.

त्या दिवशी असंच काहीसं झालं.

मार्चच्या सुरुवातीला एका मैत्रिणीच्या वाढदिवसाला फोनवरून शुभेच्छा दिल्या आणि उत्तम आयुरारोग्य चिंतिलं. ती सुंदर गाणारी म्हणून गाणं वगैरे सुरू आहे की नाही हे दरवेळेसारखंच विचारलं आणि ‘ये ना घरी एकदा गाणी म्हणायला’ असं आमंत्रण दिलं. तेव्हा ‘घरी तर येईनच गं, पण आपण ना आता वास्कोत १ एप्रिलला भेटू,’ ती म्हणाली. ‘काय विशेष?’ असं विचारल्यावर ‘अगं पंचाहत्तरी झाली ना म्हणून सगळ्या जणी जमूया. जरा मजा करूया. परत आठवण करीनच पण १ एप्रिल नक्की ध्यानात ठेव,’ ती म्हणाली. एकदम माझी ट्यूब पेटली आणि म्हटलं, ‘एप्रिल फूल तर नाही ना करत आहेस? नाहीतर तू बसशील पणजीत आणि आम्ही सगळ्या इथे वास्कोत जमून फजिती होईल आमचीच.’ तेव्हा तिनं खात्री दिली की या वयात कुठं आता एप्रिल फूल करू? पुन्हा एकदा १ एप्रिलचं पक्कं सांगून तिने फोन ठेवला. तिच्या स्वरात सच्चेपण होतं. त्या तारखेला खूण म्हणून गोल करून ठेवलं.

…पण आता तर ‘कोरोना’नंच एप्रिल फूल केलं आहे. एकत्र येण्याचं नावच नको! कुठून कसा येऊन चाहूल न देता माणसाच्या जीवनात शिरला आणि मानवजातच उद्ध्वस्त करत सुटला आहे. त्याची तीव्रता प्रचंड प्रमाणात जाणवते आहे.

माणसाच्या जीवनाला असं ग्रहण लावणार्‍या ‘कोरोना’इतका मात्र ‘एप्रिल फूल’ क्रूर आणि कठोर नसतो. वसंतऋतूच्या आगमनाने चैतन्यमय झालेल्या सृष्टीत मानवी मन उल्हसित होते आणि थोडी मौजमजा, थोडा मिश्किलपणा, थोडी थट्टा अशा स्वरूपात ‘एप्रिल फूल’द्वारे गमतीदारपणा व्यक्त होतो. मार्च-एप्रिलचे हेच दिवस साधारणपणे आपल्याकडे होळी साजरी होते तीही अशीच रंग फेकून, चिखलफेक करून आणि काही व्रात्य, अर्वाच्च बडबड करून. त्याआधी कार्निव्हल ‘खा, प्या, मजा करा’चा संदेश देते. एप्रिल फूल हा साधारण असाच मजेदार पद्धतीने किंवा कधीकधी खोडसाळपणे तर कधी दुसर्‍याची खिल्ली उडवत साजरा होणारा दिवस.

आता जेव्हा एखादा दिवस साजरा करण्याइतका महत्त्वाचा ठरतो तेव्हा त्यामागे काही कारण, प्रथा, परंपरा असतेच. तसं पाहता भारताच्या दृष्टीने संपूर्ण एप्रिल महिनाच अतिशय महत्त्वपूर्ण घटनांनी गजबजलेला आहे. तसाच अनेक वैश्‍विक महत्त्वपूर्ण घटनांनीही! १ एप्रिल उडीसा राज्यस्थापना, २ एप्रिल विश्‍व आत्मकेंद्रितता दिवस, ५ एप्रिल विश्‍वसमुद्री दिवस, ६ एप्रिल आंतरराष्ट्रीय खेेळदिवस, ७ एप्रिल विश्‍व स्वास्थ्यदिवस, १० एप्रिल विश्‍व होमिओपथी दिवस, १४ एप्रिल आणि १५ एप्रिल हे लागोपाठ दोन महामानव डॉ. आंबेडकर आणि गुरुदेव नानक यांच्या जयंतीचे दिवस, १८ एप्रिल विश्‍व विरासत दिवस, २१ एप्रिल सिव्हिल सेवा दिवस, २२ एप्रिल पृथ्वी दिवस, २३ एप्रिल विश्‍व पुस्तक आणि कॉपीराईट दिवस, २४ एप्रिल राष्ट्रीय पंचायत दिवस, २५ एप्रिल विश्‍व मलेरिया दिवस, २८ एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस, याशिवाय यावर्षी २ एप्रिलला येणारी रामनवमी (रामजन्म) आणि ८ एप्रिलला येणारी हनुमानजयंती हे भारतीय मनात रुजले, रुतलेले सण उत्सव झालेले शुभदिवस.

मात्र ‘एप्रिल फूल’ हा १ एप्रिल या तारखेला जास्त करून सुरू होतो आणि मानला जातो. इतर देशांतून सुरू झालेला, खूप प्राचीन काळातल्या (१३५२) ‘हिलेरिया’ उत्सवाचा तो भाग आहे असे मानले जाते; किंवा तो त्याचाच एक प्रकार आहे. प्राचीन युरोपमध्ये १५८२ मध्ये १३ व्या पोप ग्रेगरीने ज्युलियन कॅलेंडर सोडून ग्रेगरिअन कॅलेंडर सुरू केले. त्याप्रमाणे १ जानेवारीला नववर्ष सुरू झाले. रोमन लोकांनी त्याचा स्वीकार केला, पण खूप लोक १ एप्रिललाच नववर्ष साजरे करत होते. म्हणून लोक त्यांची थट्टा करू लागले. काही भुलथापाही प्रसारित केल्या गेल्या. त्यांचे ते बळी ठरले. त्यामुळे १ एप्रिलला लोकांना ‘फूल’ करण्याचा म्हणजे मूर्ख बनवण्याचा पायंडा युरोपमध्ये पडला. पाश्‍चिमात्त्य देशांत याची सुरुवात झाली आणि जगात त्याचे पडसाद उमटले.

न्यूझिलंड, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, फ्रान्स, इटली, द. कोरिया, जपान, रूस, नेदरलँड, जर्मनी, ब्राझिल, कॅनडा, अमेरिका असे सारे देश ‘एप्रिल फूल’ करण्यास सरसावले. कुणी १ एप्रिलचा अर्धा दिवस, कुणी तो संपूर्ण दिवस तर कुणी एप्रिलचा १ला आणि दुसरा दिवस हा ‘एप्रिल फूल डे’ किंवा ‘मूर्ख दिवस‘ म्हणून पाळतात.

अफवा पसरविणे, लोकांना खर्‍याच वाटतील अशा तर्‍हेने गोष्टी सांगून वा करून त्यांची फसवणूक करणे आणि फसलेल्यांची खिल्ली उडवणे, त्यांना खिजवणे, अगदी साध्या साध्या फालतू वाटतील अशा गोष्टीत त्यांना मूर्ख बनवून स्वतः मजा घेणे असे या ‘मूर्ख दिवसा’चे साधारण स्वरूप असते. त्यामुळे बेसावध राहून चालत नाही; नाहीतर तोंडघशी पडायला होते किंवा खरोखरच आपण मूर्ख ठरतो. दाराची घंटी वाजवून पळून जाणे, रबराची पाल किंवा साप अंगावर किंवा घरात आणून टाकणे, खोटी नोट रस्त्यावर टाकून लपून मजा बघणे असे प्रकारही चालतात. फ्रान्समध्ये ‘फिश डे’ म्हणून मुले दुसर्‍याच्या पाठीवर कागदाचे मासे चिकटवतात.

पूर्वी राजा रिचर्ड आणि ऍनी यांच्या साखरपुड्याची तारीख ३२ मार्च अशी जाहीर झाली आणि लोकांनी ती खरी मानली आणि ते मूर्ख ठरले. कारण ३२ मार्च म्हणजेच १ एप्रिल. महिन्याचे ३२ दिवस असूच शकत नाहीत अशी एक कथा त्यामागे असल्याचे सांगितले जाते. तर ज्योफ्री चॉसरच्या ग्रंथात प्रथम एप्रिल-फूलचा उल्लेख आढळतो असेही सांगितले जाते. २००८ मध्ये बीबीसीने ‘फ्लाइंग पेंग्विन’ची वावडी उडविली होती. बिघडलेलं हवामान आणि थंडीमुळे पेंग्विन उडतात असं त्याचं स्पष्टीकरणही केलं होतं. तर एके वर्षी १ एप्रिलला डच न्यूजपेपरने आपल्या मुखपृष्ठावरच जाहीर केलं की प्रिंटरच्या शाईचा वास आल्याने पेपर वाचताना नकोसा वाटतो म्हणून आता ट्युलीवच्या वासाची नवीन शाई वापरण्याचे ठरले आहे. तेव्हा नाश्त्याच्या टेबलवर पेपर वाचणार्‍या लोकांनी ‘केव्हापासून’ याची शहानिशा न करताच पेपर हुंगले आणि ते ‘फूल’ ठरले.

एप्रिल-फूल करण्यासाठी अशा अनेक क्लृप्त्या लढविल्या जातात आणि अनेक गमतीजमती घडतात. जोपर्यंत त्या गोष्टीपासून नुकसान होत नाही किंवा त्या-त्या व्यक्ती वा व्यक्तीसमूहांचा अपमान, मानहानी होत नाही तोपर्यंत हा सारा खेळीमेळीचा मामला असतो. थट्टा, खोडकरपणाही असतो. शालेय वयात एखाद्या मुलाला खेळताना पडल्याने खूप लागलंय म्हणून वर्गशिक्षिकेला ताबडतोब बोलावणं, मामा आलाय असं सांगून आईला बोलावणं, मित्रांना कुठेतरी येण्यासाठी सांगून आपण गैरहजर राहाणं असे अनेक निरुपद्रवी प्रकार हे क्षम्य असतात. कारण वसंतऋतूची हवाच अशी विलक्षण कल्पक आणि चैतन्यमय, चित्तवृत्ती उल्हसित करणारी असते. आणि दुसर्‍यांना मूर्ख बनवणं किंवा स्वतः बनणं यातही एक गंमत असते. जीवनाचा ताण त्यामुळे हलकाफुलका होतो हे मात्र नक्की!