इयत्ता सहावी ते दहावी, तसेच बारावी इयत्तेचे शैक्षणिक वर्ष येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यासाठी शिक्षण खात्याने नियमांचा मसुदा जाहीर केला आहे. त्यासंबंधीची अधिसूचना काल काढण्यात आली. त्यानुसार नवे शैक्षणिक वर्ष यंदापासून एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे. मात्र, एप्रिल महिन्यापासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी आठवडाभर शाळा बंद ठेवण्यात येतील. त्यासाठी गोवा शाळा शिक्षण नियमांत दुरुस्ती करण्यात येणार आहे. सरकारने या मसुद्यासाठीच्या सूचना व आक्षेप यासाठी पाच दिवसांचा अवधी दिला आहे.
यासंबंधीच्या सगळ्या सूचना व आक्षेप हे शिक्षण संचालकांना पाच दिवसांच्या आत पाठवून द्यावे लागणार आहेत. या मसुद्याला अंतिम रूप देण्यापूर्वी हे आक्षेप व सूचना यांचा अभ्यास केला जाणार आहे, असे अधिसूचनेतून स्पष्ट करण्यात आले आहे. ही अधिसूचना काढल्याच्या दिवसापासून पाच दिवसांनंतर हे मसुदा नियम विचारात घेतले जातील. सदर अधिसूचना ही 12 मार्च रोजी सरकारी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्यातील काही पालक-शिक्षकांसह अन्य काही लोकांनी येत्या एप्रिल महिन्यापासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास विरोध दर्शविला आहे. एप्रिल महिन्यात कडक उन्हाळ्यामुळे तापमान वाढणार असल्याने अशा परिस्थितीत शाळांचे वर्ग सुरू करणे हे विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरू शकते. तसेच उन्हाळ्यातील सुट्टीही कमी होणार असल्याने मुलांना उन्हाळ्यातील शिबिरे, तसेच मौजमजा करता येणार नसल्याचेही मत काहीजणांनी व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने आता लोकांकडून सूचना व आक्षेप मागवलेले असल्याने त्यांना आपली मते मांडता येणार
आहेत.