एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्ष प्रारंभ; आव्हान याचिकेवर सोमवारी सुनावणी

0
10

एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवार दि. 24 मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणी होणार आहे.
येत्या 7 एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला काही पालकांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. या आव्हान याचिकेवर मागील आठवड्यात सुनावणी झाली होती. राज्य सरकारने या याचिकेसंबंधी प्रतिज्ञापत्र काल सादर केले. त्या प्रतिज्ञापत्राला उत्तर देण्यासाठी याचिकादारांनी वेळ मागितली. त्यामुळे या याचिकेवर 24 मार्चला सुनावणी घेतली जाणार आहे.

इयत्ता सहावीपासून दहावीचे नवे शैक्षणिक वर्ष येत्या 7 एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाला विविध भागांतील पालकांकडून विरोध होत आहे. एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास विरोध करणारी निवेदने शिक्षण संचालक, शिक्षण सचिव व इतरांना सादर करण्यात आली आहेत. काही जणांकडून एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास पाठिंबा दिला जात आहे. तथापि, वाढती उष्णता, वीज, पाणीटंचाईची समस्या यामुळे काही जणांकडून विरोध केला जात आहे. एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय आता न्यायालयाच्या निवाड्यावर अवलंबून असून, सुनावणीनंतरच नवे वर्ष कधीपासून सुरू होणार हे निश्चित होणार आहे.