एपिलेप्सीवर सेल थेरपी उपयुक्त

0
420
  • डॉ. प्रदीप महाजन

आपल्या शरीराच्या स्वतःच्या पेशींचा उपयोग मेंदूतील संबंधित आजार एपिलेप्सीवर उपचार करण्यासाठी करता येऊ शकतो. याद्वारे शरीरातील खराब झालेल्या तांत्रिक पेशी पुन्हा कार्यरत करता येऊ शकतात.

एपिलेप्सी हा एक मेंदूसंदर्भातील आजार आहे ज्यामध्ये रुग्णाला फिट (आकडी) येते. मात्र एपिलेप्सीबाबत पूर्ण माहिती नसल्याने समाजात अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे एपिलेप्सी ही केवळ शारीरिक व्याधी नसून ती सामाजिक व्याधीसुद्धा आहे. यामुळे अनेकदा रुग्ण हा आजार इतरांपासून लपवतात. पण वेळीच निदान व योग्य उपचार मिळाल्यास हा आजार नियंत्रणात आणता येऊ शकतो. याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरात सुमारे ७० दशलक्ष लोक सध्या एपिलेप्सी या आजाराने पीडित आहेत. भारतातच जवळपास १२ दशलक्ष लोक या आजारासह जगत आहेत. वेळेवर औषधोपचार सुरू ठेवल्यास अनेक वर्ष हा आजार नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. पण अलीकडच्या काळात ड्रग-प्रतिरोधक अपस्मार (डीआरई)च्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याचं मुख्य कारण, अनेक रुग्णांवर औषधांचा कुठलाही परिणाम होत नाही. औषध प्रभावी ठरत नसल्याने अनेक रुग्णांना कायमस्वरूपी अपंगत्वाचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय संपूर्ण आयुष्य एखाद्यावर अवलंबून राहावे लागू शकते. एपिलेप्सीच्या उपचारांमध्ये ‘अँटी -एपिलेप्टिक’ औषधांचा समावेश केलेला आहे. सध्या वीसहून अधिक अँटी-एपिलेप्टिक औषधे बाजारात उपलब्ध आहेत. परंतु, तरीही डीआरईच्या घटनांमध्ये बदल झालेला नाही. अनेक रुग्णांवर या औषधोपचारांचा काहीच परिणाम होताना दिसून येत नाही.

परंतु, आता एपिलेप्सीसाठी असणार्‍या औषधाव्यतिरिक्त शरीरातील पेशीचा वापर करूनही या आजारावर उपचार करता येऊ शकतात.
१५ वर्षांच्या मुलाला अधूनमधून अचानक झटके येत असल्याने कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात आणले होते. वयाच्या आठव्या वर्षी त्याला पहिल्यांदा फिट आली होती. परंतु, एपिलेप्सीचं निदान झाल्यानंतर त्याला अँटी -एपिलेप्टिक औषधे देण्यात आली होती. परंतु, मागील काही वर्षांत त्रास अधिकच वाढू लागल्याने त्याला ‘ऑटोलॉगस सेल थेरपी’ देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही सेल थेरपी एका महिन्यात दोनदा देण्यात आली. प्रत्येक थेरपीनंतर पहिल्या तीन दिवसांपर्यंत रुग्णाला फिजिओथेरपी देण्याचा सल्ला देण्यात आला, जेणेकरून फिजिओथेरपीमुळे मेंदूतील मज्जातंतूची प्रक्रिया हळूहळू सुधारण्यास मदत मिळते. सेल थेरपीच्या दोन सत्रानंतर साधारणतः २-३ महिन्यानंतर रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. वारंवार आकडी (फिट) येण्याचे प्रमाणंही कमी झाले. यामुळे अँटी -एपिलेप्टिक औषधांचा डोसही डॉक्टरांनी कमी केला. त्यानंतर वर्षभराने या मुलाची ईईजी (इलेक्ट्रोएन्सेफँलोग्राम) ही वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या चाचणीद्वारे मेंदूचे विद्युतीय सिग्नल रेकॉर्ड केलं जातं आणि एपिलेप्सी आजाराचे निदान करण्यास डॉक्टरांना मदत होते. या चाचणीत मुलाच्या प्रकृतीत कमी कालावधीत उत्तम सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.

मेंदूतील संबंधित आजार एपिलेप्सीवर उपचार करण्यासाठी आपल्या शरीराच्या स्वतःच्या पेशींचा उपयोग करता येऊ शकतो. याद्वारे शरीरातील खराब झालेल्या तांत्रिक पेशी पुन्हा कार्यरत करता येऊ शकतात. आपल्या शरीरातील विशिष्ट पेशींवर न्यूरोप्रोटेक्टिव्ह आणि अँटी-इंफ्लेमेटरी प्रभाव असतो. त्यामुळे रीजनरेटिव्ह मेडिसिनने एपिलेप्सीवर उपचार करण्यासाठी पॅथॉलॉजीला अशा पेशींचा वापर करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे रुग्णाला देण्यात येणार्‍या अँण्टी एपिलेप्टिक या औषधांचा डोस हळूहळू कमी करता येऊ शकतो. याशिवाय शक्यतो पूर्णपणे बंदही करता येतो.
एपिलेप्सी हा आजार आपल्या देशात सामाजिक कलंक ठरतो आहे. अशा रुग्णांना शारीरिक नव्हे तर मानसिक समस्यासुद्धा असते. परंतु, या आजाराबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमजुती आहेत. याचं मुख्य कारणं समाजात या आजाराबद्दल असलेला जनजागृतीचा अभाव हे आहे. याशिवाय औषधोपचाराद्वारे या आजाराचे कशाप्रकारे प्रभावीपणे व्यवस्थापन करता येऊ शकते, याबाबतही लोकांना पुरेशी माहिती नाही.