>> मायकल डग्लस यांना जीवनगौरव पुरस्कार
>> व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप
54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘एन्डलेस बॉर्ड्र्स’ ह्या अब्बास अमिनी यांनी दिग्दर्शित केलेल्या इराणी चित्रपटाला सुवर्ण मयूर हा उत्कृष्ट सिनेमासाठीचा पुरस्कार प्राप्त झाला. 40 लाख रु. रोख व सुवर्ण मयूर असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर उत्कृष्ट दिग्दर्शकासाठी असलेला रौप्य मयुर हा पुरस्कार ‘ब्लागास लेसन्स’ ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक सेफान कॉमनडेरन यांना मिळाला. 15 लाख रु. रोख व रौप्य मयूर असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पदार्पणातील दिग्दर्शक (दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट) ह्या गटातील पुरस्कार ‘व्हेअर द सिडलिंग्ज ग्रो’ ह्या इराणी चित्रपटाचे दिग्दर्शक रेगर आजाद काया यांना मिळाला. युनेस्को गांधी शांतता पुरस्कार ‘ड्रिफ्ट’ ह्या अँथनी येन दिग्दर्शित फ्रान्स चित्रपटाला प्राप्त झाला. दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांना त्यांच्या ‘कांतारा’ ह्या बहुचर्चित कन्नड चित्रपटासाठी विशेष ज्युरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यंदापासून सुरू करण्यात आलेला उत्कृष्ट ओटीटी वेब सिरीजसाठी असलेला पुरस्कार पंचायत (सिझन-2) ह्या सिरीजला देण्यात आला. 10 लाख रु. रोख असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर उत्कृष्ट अभिनेत्यासाठी असलेला पुरस्कार ‘एन्डलेस बॉर्ड्र्स’ ह्या चित्रपटात नायकाची भूमिका केलेले अभिनेते पौरिया राहेमी सेम यांना देण्यात आला. तर उत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा पुरस्कार ‘पार्टी ऑफ फूल्स’ ह्या चित्रपटात नायिकेची भूमिका केलेल्या मेलानी थेरेरी यांना प्राप्त झाला.
काल झालेल्या इफ्फीच्या समारोप सोहळ्यात ह्या पुरस्कारांची घोषणा करण्याबरोबरच ह्या पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हे समारोप सोहळ्याला हजर राहू शकले नाहीत. मात्र, त्यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे इफ्फीचे यशस्वी आयोजन झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
समारोप सोहळ्याला ईएसजीच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो, इफ्फीचे संचालक पृथूल कुमार, वर्ल्ड सिनेमासाठीच्या ज्युरीचे चेअरमन शेखर कपूर, गायक हरिहरन, अभिनेते किरण कुमार, गोव्याचे मुख्य सचिव पुनित कुमार गोयल, समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, तसेच चित्रपटसृष्टीतील कलाकार मोठ्या संख्येने हजर होते.
कार्यक्रमाच्या शेवटी आयुष्यमान खुराना व अन्य कलाकारांचा रंगारंग कार्यक्रम संपन्न झाला. निवेदन अभिनेत्री मंदिरा बेदी यांनी केले. तर आभार इफ्फीचे संचालक पृथूक कुमार यांनी मानले.
चित्रिकरणासाठी गोव्यात निर्मात्यांचे स्वागत ः मुख्यमंत्री
समारोप सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे म्हणाले की, राज्यात जास्तीत जास्त चित्रपट निर्मात्यांनी चित्रिकरणासाठी यावे यासाठी सरकार आता निर्मात्यांना चित्रिकरणासाठी लागणारा परवाना सुलभपणे देऊ लागले आहे. गोव्यात चित्रिकरणासाठी येणाऱ्या निर्मात्यांचे सरकार स्वागतच करणार असल्याचे त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. यंदाच्या इफ्फीचा 7 हजार प्रतिनिधींनी लाभ घेतल्याचे सांगून त्यांच्यामुळे इफ्फी संस्मरणीय झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
78 देशातील 270 चित्रपट यंदाच्या इफ्फीतून दाखवण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले. यंदा गोमंतकीय चित्रपटांनाही इफ्फीत चांगले व्यासपीठ मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
एनएफडीसी, ईएसजी व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या तीन संस्थांनी यंदाच्या इफ्फीचे यशस्वीपणे आयोजन केले, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ह्या तिन्ही संस्थांची प्रशंसा केली.
मायकल डग्लस यांना जीवनगौरव पुरस्कार
अमेरिकी निर्माते व चित्रपट अभिनेते मायकल डग्लस यांचा काल इफ्फीच्या समारोप सोहळ्यात ‘सत्यजीत रे जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना मायकल डग्लस यांनी सत्यजीत रे यांच्यासारख्या महान चित्रपट दिग्दर्शकाच्या नावाने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार आपणास दिल्याबद्दल आभार मानताना हा आपला मोठा सन्मान असल्याचे सांगितले. चित्रपटातून मानवता व मानवी जीवनाचे दर्शन घडत असते, असे मतही डग्लस यांनी यावेळी व्यक्त केले.