‘एनडीए’ला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण

0
4

राष्ट्रपतींकडून नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदी नियुक्ती; घटक पक्षांकडून पाठिंब्याचे पत्र; रविवारी होणार शपथविधी सोहळा

संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदींची यांची निवड झाल्यानंतर काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना रविवारी शपथविधी सोहळ्यात पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी औपचारिक आमंत्रण दिले. रविवार दि. 9 जून रोजी सायंकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये काल एनडीएच्या घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर एनडीएच्या शिष्टमंडळाने काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि नरेंद्र मोदी यांची भाजपच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. तसेच एनडीएच्या घटक पक्षांच्या पाठिंब्याची पत्रेही राष्ट्रपतींना देण्यात आली.
एनडीएचे पत्र मिळाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना बोलावून त्यांना पंतप्रधानपदी नियुक्ती केल्याचे पत्र दिले. तसेच, केंद्रीय मंत्रिमंडळ स्थापन करण्याचे आदेश दिले.

तत्पूर्वी, काल सकाळी 11 वाजता भाजपच्या नेतृत्वातील एनडीएच्या घटकपक्षांची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक सुरू झाली. या बैठकीत एनडीएचे सर्व 293 खासदार, राज्यसभा खासदार आणि एनडीएशाससित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित आहेत. याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह एनडीएच्या घटक पक्षांच्या सर्व अध्यक्षांना मंचावर विशेष स्थान मिळाले.

दुपारी बाराच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सेंट्रल हॉलमध्ये एन्ट्री झाली. त्यांचे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्वागत केले. मोदींच्या एन्ट्रीवेळी सेंट्रल हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी सर्व खासदारांनी उभे राहून आणि टाळ्यांचा कडकडाट करुन मोदींचे स्वागत केले. मोदींनी सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी संविधानाच्या प्रतीला वंदन केले.
या बैठकीत राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्या संसदीय नेतेपदी निवडीचा प्रस्ताव ठेवला, त्याला अमित शहा, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, कुमारस्वामी, नितीश कुमार यांनी अनुमोदन दिले.

भाषणात काय म्हणाले नरेंद्र मोदी?
ज्यांनी ज्यांनी आपली सत्ता येण्यासाठी अथक प्रयत्न केले, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. एनडीएच्या नेते पदी माझी निवड करुन तुम्ही सगळ्यांनी मला नवी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मी तुमचा खूप खूप आभारी आहे. माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. आज पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी माझी नेतेपदी निवड केली आहे याचा अर्थ आहे की माझ्यावर तुम्ही विश्वास दाखवला आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

एनडीए ही नैसर्गिक आघाडी : मोदी
केवळ सत्ता प्राप्त करणे किंवा सरकार चालविण्यासाठी एकत्र आलेला आमचा गट नाही. राष्ट्र प्रथम या मूळ भावनेतून एनडीएचा समूह एकत्र आला आहे. 30 वर्षांच्या या मोठ्या कार्यकाळात एनडीए एक नैसर्गिक आघाडी म्हणून पुढे आली आहे. अटल बिहार वाजपेयी, प्रकाशसिंग बादल, बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव असे असंख्य नावे यानिमित्ताने घेता येतील. या लोकांनी जे बी पेरले, त्याला आज जनतेच्या सिंचनातून वटवृक्ष करण्यात आम्हाला यश आले आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, भाजपला स्वबळावर 240 आणि एनडीएला 293 जागा मिळाल्या आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 272 इतका आहे.

मोदींकडून 39 वेळा एनडीए शब्दाचा प्रयोग
कालच्या बैठकीत एनडीएच्या खासदारांना संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सरकारने गेल्या 10 वर्षात केलेल्या कामांचा पाढा वाचला. महत्त्वाचे म्हणजे नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 48 मिनिटांच्या भाषणात जवळपास 39 वेळा एनडीए आणि युती या शब्दांचा प्रयोग केला. खरे तर 2014 आणि 2019 मध्ये भाजपाने स्वबळावर सत्ता स्थापन केली होती. त्यासाठी त्यांना एनडीएतील घटक पक्षांची गरज भासली नव्हती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. यंदा भाजपाला स्वबळावर पूर्ण बहुमत न मिळाल्याने एनडीएतील घटकपक्षांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळेच मोदींनी एनडीए शब्दावर भर दिल्याचे बोलले जात आहे.

खातेवाटपाबाबत घटक पक्षांशी चर्चा सुरू
मोदी 3.0 च्या नवीन मंत्रिमंडळाच्या स्थापनेसंदर्भात केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह हे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी एनडीए घटक पक्षांशी वन-टू-वन बैठक घेत आहेत. या बैठकीत मंत्रिमंडळातील जागा आणि खातेवाटपाबाबत घटक पक्षांच्या मागण्या ऐकून घेतल्या जात असून, त्या आधारे नवे मंत्रिमंडळ तयार केले जाणार आहे.

भाजपकडून जेडीयूला 3 मंत्रिपदांची ऑफर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने आघाडीतील पक्षांना मंत्रिपद देऊ केले आहे. जेडीएसला एक, आरएलडीला एक, अपना दल एक, जेडीयूला 3, राष्ट्रवादीला एक आणि शिवसेना (शिंदे) एक मंत्रिपद देऊ केले आहे.

टीडीपी, जेडीयूचा मोठ्या खात्यांवर डोळा
सूत्रांच्या माहितीनुसार, टीडीपी व जेडीयूचा गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, राजमार्ग, वाणिज्य, रेल्वे, कृषी, पेट्रोलियम, ऊर्जा आदी महत्त्वाच्या खात्यांवर डोळा आहे. पण जर चंद्रबाबू नायडू किंवा नितीशकुमार यांच्यासारखे दिग्गज नेते मुख्यमंत्रिपद सोडून केंद्रात येण्यास तयार असतील, तर त्यांनाच अशा खात्याची जबाबदारी दिली जाईल, असे भाजपचे म्हणणे आहे.

मोदींकडून 39 वेळा एनडीए शब्दाचा प्रयोग
कालच्या बैठकीत एनडीएच्या खासदारांना संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सरकारने गेल्या 10 वर्षात केलेल्या कामांचा पाढा वाचला. महत्त्वाचे म्हणजे नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 48 मिनिटांच्या भाषणात जवळपास 39 वेळा एनडीए आणि युती या शब्दांचा प्रयोग केला. खरे तर 2014 आणि 2019 मध्ये भाजपाने स्वबळावर सत्ता स्थापन केली होती. त्यासाठी त्यांना एनडीएतील घटक पक्षांची गरज भासली नव्हती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. यंदा भाजपाला स्वबळावर पूर्ण बहुमत न मिळाल्याने एनडीएतील घटकपक्षांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळेच मोदींनी एनडीए शब्दावर भर दिल्याचे बोलले जात आहे.