एनआरआयच्या मालमत्ता रक्षण ः कायदा दुरुस्ती प्रस्ताव

0
160

>> आगामी विधानसभा अधिवेशनात विधेयक

अनिवासी भारतीय नागरिकांच्या (एनआरआय) मालमत्तेच्या रक्षणासाठी कायद्यात दुरूस्ती करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. याबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा केली असून आगामी अधिवेशनात हे दुरूस्ती विधेयक विधानसभेत सादर केले जाणार आहे, अशी माहिती नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांताक्रुज येथे काल दिली.
राज्यात काही अनिवासी भारतीय नागरिकांच्या बनावट पॉवर ऑफ ऍटर्नी घेऊन त्यांच्या मालमत्तेच्या विक्रीची प्रकरणे घडलेली आहेत. या पार्श्‍वभूमीवर अनिवासी भारतीय नागरिकांना आवश्यक संरक्षण देण्यासाठी कायद्यात योग्य तरतूद केली जाणार आहे. पॉवर ऑफ ऍटर्नी तयार करताना अनिवासी भारतीय नागरिकांची उपस्थिती बंधनकारक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असेही मंत्री सरदेसाई यांनी सांगितले.

युएई येथे गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्यालय सुरू करण्यात आलेले नाही, असा खुलासा मंत्री सरदेसाई यांनी केला. युएई येथे गोवा फॉरवर्डचे पक्ष कार्यालय सुरू करण्यात आल्याच्या प्रश्‍नावर बोलताना सरदेसाई म्हणाले की, युएई येथे पक्षाचे कार्यालय सुरू करण्यात आलेले नाही. तर तेथील गोमंतकीयांनी आपल्या समस्या, प्रश्‍नांवर विचार विनिमय करण्यासाठी गोवा फॉरवर्ड युएई मंच स्थापन केला आहे. या ठिकाणी २ लाख गोमंतकीय राहतात. जगभरात ज्या – ज्या ठिकाणी अनिवासी भारतीय नागरिक कार्यरत आहेत. त्या – त्या ठिकाणी गोवा फॉरवर्ड मंच स्थापन करण्याचा विचार आहे, असेही मंत्री सरदेसाई यांनी सांगितले.

कॉँग्रेस पक्षाला केवळ निवडणुकीच्या वेळी अनिवासी भारतीयांची आठवण होते. त्यांचे प्रश्‍न सोडविण्याकडे दुर्लक्ष केला जात आहे, असे सांगून सरदेसाई म्हणाले की, गोवा फॉरवर्डकडून जगभरात पसरलेल्या गोमंतकीयांशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. युएईमधून या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली आहे. यापुढे कॅनडा, लंडन, ऑस्ट्रेलिया आदी देशात मंच स्थापन केले जाणार आहेत.