![Hero ISL 2018 M10 - Delhi Dynamos FC v ATK](https://navprabha.com/wp-content/uploads/2018/10/17FT-Photos-M10-DDFC-vs-ATK_1.jpg)
दिल्ली
बदली खेळाडू अल मैमौनीने सामना संपण्यास केवळ ६ मिनिटे बाकी असताना नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर ऍटलेटिको दी कोलकाताने दिल्ली डायनॅमोजवर २-० अशी मात करीत इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या पर्वातील पहिल्या विजयाची नोंद केली. नेहरू स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात आला.
एटीकेचे खाते २०व्या मिनिटाला बलवंत सिंगने उघडले होते. दिल्लीने ५४व्या मिनिटास कर्णधार प्रीतम कोटल याच्या गोलमुळे बरोबरी साधली होती. एटीकेचे प्रशिक्षक स्टीव कॉपेल यांनी ८१व्या मिनिटाला कालू उचे याच्यासारख्या गेल्या मोसमात चमकलेल्या स्ट्रायकरऐवजी नौसैरला पाचारण केले. मॅन्युएल लँझरॉतने ही चाल रचली. डावीकडून त्याने पलीकडील बाजूला असलेल्या जयेश राणेला पास दिला. राणेने जास्त ताकद लागूनही प्रसंगावधान दाखवित दोन प्रतिस्पर्ध्यांना चकविले. मग त्याने नौसैरला अलगद पास दिला. नौसैरने मग कामगिरी फत्ते केली. डोरोन्सोरो झेप टाकूनही चेंडू अडवू शकला नाही.
एटीकेने या विजयासह तळातील दहाव्या क्रमांकावरून थेट सहावा क्रमांक गाठला. त्यांनी दिल्लीला मागे टाकले. घरच्या मैदानावर दोन पराभव पत्करावे लागल्यानंतर एटीकेने या कामगिरीसह चाहत्यांना दिलासा दिला. दिल्ली हरल्यामुळे त्यांची विजयाची प्रतिक्षा लांबली.
एटीकेने मोसमातील पहिल्यावहिल्या गोलची प्रतिक्षा अखेर तिसर्या सामन्यात २०व्या मिनिटाला संपुष्टात आणली. त्यांना सकारात्मक सुरवातीचे फळ मिळाले. बलवंतने डावीकडे विनीत रायला चकवून चेंडूवर ताबा मिळविला. प्रीतम कोटल यालाही त्याने चकविले. मग दिल्लीचा गोलरक्षक फ्रान्सिस्को डोरोन्सोरो याला चकवित त्याने अचूक फिनीशिंग केले.
एटीकेने सुरवात सकारात्मक केली. लँझरॉतने पहिल्याच मिनिटाला हाफलाईनवरून डावीकडे जॉन जॉन्सनला पास दिला. जॉन्सनचे हेडिंग डोरोन्सोरोने सहज अडविले. दिल्लीची पहिली चाल सहाव्या मिनिटाला झाली. राणा घरामीने दिर्घ पास देत डावीकडील नारायण दासच्या दिशेने चेंडू सोपविला. नारायणने चपळाई दाखविली, पण त्याने वाजवीपेक्षा जास्त ताकद लावली.
तीन मिनिटांनी कालू उचेने मैदानाच्या मध्यातून बॉक्सच्या डावीकडील बलवंतला पास दिला. बलवंतने चेंडूवर ताबा मिळवित डाव्या पायाने किक मारली, पण दिल्लीचा मध्यरक्षक शुभम सारंगी याने ती ब्लॉक केली. पुढच्याच मिनिटाला लँझरॉतने दिल्लीच्या क्षेत्रात धडक मारली. ३५ यार्डावरून त्याने फ्री कीक घेतली. कालूने नेटसमोरील धुमश्चक्रीत सरस उडी घेतली, पण त्याचा हेडर पुरेसा उंच नव्हता. त्यामुळे डोरोन्सोरो चेंडू सहज अडवू शकला.
दुसर्या सत्रात दिल्लीची सुरवात चांगली झाली. ४९व्या मिनिटाला सारंगीचा फटका एटीकेच्या जॉन जॉन्सन याने थोपविला. चेंडू बाहेर गेल्यामुळे दिल्लीला कॉर्नर मिळाला. उजवीकडून नारायणने प्रीतमच्या दिशेने चेंडू मारला. त्यावर प्रीतम हेडींगचे टायमिंग साधू शकला नाही.
५३व्या मिनिटाला दिल्लीने आणखी एक कॉर्नर मिळविला. मिहेलीचने डावीकडून मारलेला चेंडू हाल्दरने बाहेर घालविला. त्यामुळे आणकी एक कॉर्नर मिळाला. जो घेतला जाईपर्यंत पुढचा मिनिट सुरु झाला होता. नारायणने उजवीकडून घरामीच्या दिशेने चेंडू मारला. घरामीने हेडिंगवर प्रीतमसाठी संधी निर्माण केली. प्रीतमने चपळाईने उडी घेत हेडिंग करीत एटीकेचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य याला चकविले.