एफसी गोवा संघाने हीरो इंडियन सुपर लिगच्या चौथ्या मोसमात गतविजेत्या एटीकेवर ५-१ असा दणदणीत विजय नोंदविला. याबरोबरच गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर झेप घेत गोव्याने बाद फेरीच्या आशा कायम राखल्या. नेहरू स्टेडीयमवरील घरच्या मैदानावर गोव्याने पूर्वार्धातच तीन गोलांचा धडाका लावत भक्कम पकड घेतली.
एफसी गोवाच्या या विजयामुळे केरळा एफसीचे बाद फेरीत प्रवेशाच्या आशा संपुष्टात आल्या. आता एफसी गोवा आणि जमेशदपूर यांच्यात ४ रोजी होणारा सामना निर्णायक ठरला आहे. या सामन्यात एफसी गोवाने बरोबरी जरी साधली तरी त्यांचे बाद फेरीतील स्थान निश्चित होईल. परंतु जमशेदपूरने विजय मिळविल्यास ते २९ गुणांसह बाद फेरीत प्रवेश करतील.
मॅन्युएल लँझारोटे याने दोन, तर सर्जीओ ज्यूस्ट, फेरॅन कोरोमिनास आणि मार्क सिफ्नेऑस यांनी प्रत्येकी एका गोलची भर घातली. गोव्याची स्पर्धेतील एकूण गोलांची संख्या ३९ झाली. यात कोरोमीनास याने १६ गोलांचे योगदान दिले आहे. गोव्याचा गोलफरकही ११ (३९-२८) असा सरस झाला.
गोव्याने १७ सामन्यांत आठवा विजय मिळविला असून तीन बरोबरी व सहा पराभव अशा कामगिरीसह त्यांचे २७ गुण झाले. जमशेदपूर एफसी (१७ सामन्यांतून २६), केरळा ब्लास्टर्स (१७ सामन्यांतून २५) यांना मागे टाकत गोव्याने सहा वरून दोन क्रमांक प्रगती करीत चौथा क्रमांक गाठला. बंगळुरू एफसी (३७), एफसी पुणे सिटी (२९) आणि चेन्नईन एफसी (२९) या तीन संघांनी बाद फेरीतील प्रवेश यापूर्वीच नक्की केला आहे. येत्या रविवारी (४ मार्च) जमशेदपूर आणि गोवा यांच्यात जमशेदपूरला लढत होईल. त्यातील विजयी संघाची आगेकूच नक्की असेल. एटीकेची शोकांतिका कायम राहिली. १७ सामन्यांत त्यांना दहावा पराभव पत्करावा लागला. तीन विजय व चार बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे १३ गुण आणि शेवटून दुसरे म्हणजे नववे स्थान कायम राहिले.