दि. १७ रोजी आंबिर्ण सुकूर येथील युनियन बँकेचे एटीएम मशीन पळवून आतील सुमारे १९ लाखांची रोकड पळविण्यार्या चोरट्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना काल गोवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. गोवा गुन्हे शाखा आणि उत्तर गोवा जिल्हा पोलिसांच्या सहकार्याने दिल्ली पोलिसांनी ही कामगिरी केली होती.
याप्रकरणी दिल्लीतील सीमापुरी झोपडपट्टीतून प्रमुख आरोपी रुस्तम सुहाग, मोहम्मद सफी आणि सफिकूल मुल्ला यांना पकडण्यात आले आहे. यातील रुस्तम हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाला असून त्याच्यावर दिल्लीतील इस्पितळात उपचार चालू आहेत. इतर दोन आरोपी मोहम्मद सफी आणि सफिकूल मुल्ला यांना दिल्ली पोलिसांनी गोव्यातून दिल्लीला गेलेल्या गोवा पोलिसांच्या पथकाकडे सुपूर्द केले. गुन्ह्यात सामील झालेले तिन्ही आरोपी बांगलादेशी असून चोरी करण्यापूर्वी दोन दिवस गोव्यात आले होते. जुलै २०१९ मध्ये कोलवाळ येथील एचडीएफसी बँकेच्या फोडलेल्या एटीएम चोरीत अटक झालेल्या रुस्तम या प्रमुख आरोपीचा हात होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
काल मंगळवारी रात्री उशिरा सदर पोलीस पथक आरोपीना घेऊन रेल्वेमार्गे गोव्यात पोचले असून आज बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.