>> मडगाव येथे दोघे रोमानियन जेरबंद
रावणफोंड येथून बँकेचे एटीएम चोरून नेण्याची घटना ताजी असताना मडगाव कदंबा बसस्थानकानजीक ओसिया इमारत संकुलात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये कॅमेरा व स्कीमर बसवून पैसे लुटण्याच्या तयारीत असलेल्या रोमानिया येथील दोघांना फातोर्डा पोलिसांनी अटक केली. इमील सरबूर कोस्तांसियो व डॅनियल पॉल हुमिया अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून मास्क, टोप्या व इतर सामान हस्तगत केले आहे, अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली.
स्टेट बँकेच्या अत्याधुनिक यंत्रणेमुळे पोलिसांना संशयितांना जेरबंद करता आले. रोमानिया येथील नागरिक इमील सरबूर कोस्तांसियो (३२) व्यवसायाने पोकर डिलर व दुसरा डॅनियल पॉल हुमिया (३८) व्यवसायाने कार्पेंटर असून दोघांनी मिळून बँका लुटण्याचा प्रयत्न केला होता. दोन दिवसांआधी या दोघांनी ओसिया इमारतीतील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये कॅमेरा बसवून स्कीमर लावला होता. या एटीएममध्ये काही तांत्रिक प्रकार घडल्याचा सुगावा आधुनिक तंत्रज्ञानामुळे स्टेट बँकेच्या मुख्य कचेरीला लागला व त्यांनी तात्काळ स्थानिक शाखा प्रमुखांना कळविले. शाखा प्रमुखांनी फातोर्डा पोलिसांकडे तक्रार करताच त्यांनी तेथे पाळत ठेवली.
काल दुपारी दोघेजण वाहन घेऊन या एटीएम बाहेर घिरट्या घालू लागले. मात्र, संशय आल्याने ते परत गेले. रात्री परत येताच पोलिसांचा संशय दुणावला व त्यांनी दोन्ही वाहनांचे नंबर नोंदवून घेतले. त्यावेळी संशय आल्याने ते पळून गेले. त्यांचा पाठलाग फातोर्डा पोलिसांनी केला व त्यांना वागातोर येथे ताब्यात घेतले. इमील हा एका गेस्ट हाऊसमध्ये भाड्याच्या खोलीत एक महिन्यापासून राहात होता तर डॅनियल दोन महिन्यांपासून वालेरी गॅलरी येथे खोली भाड्याने घेवून राहात होता. दोघांच्या खोल्यांची झडती घेतली असता तेथे मास्क, टोप्या व इतर सामान सापडले.
पोलिसांनी एटीएममधील कॅमेरा व स्कीमर जप्त केला. एटीएममधून रक्कम काढणार्या ग्राहकांचे कार्ड क्रमांक कॅमेर्यात नोंदले जायचे व पैसे काढणार्यांच्या खात्यांची रक्कम व क्रमांक स्कीमरवर नोंदला जायचा. त्यातून खातेदाराचा क्रमांक, कार्ड क्रमांक नोंदल्यानंतर बनावट कार्डे तयार करून रक्कम लुटण्याचे संशयितांचे कारस्थान होते. फातोर्डा पोलीस स्टेशनचे निरीक्षक नवलेश देसाई यांनी त्यांना पकडण्यात यश मिळविले. काल दोघांना कोर्टात सादर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी फर्मावली.