एटीएममधून पैसे काढणे जानेवारीनंतर महागणार

0
11

ग्राहकांना आता एटीएममधून पाचवेळा विनाशुल्क पैसे काढण्याची मर्यादा ओलांडली तर त्यावर शुल्क आकारले जाणार आहे. १ जानेवारी २०२२ पासून लोकांनी विनामूल्य व्यवहाराची मर्यादा ओलांडल्यानंतर बँकांना एटीएम व्यवहारांवर प्रति व्यवहार २१ रुपये आकारण्याची परवानगी दिली आहे. याशिवाय ग्राहकांना त्यावर जीएसटीही भरावा लागणार आहे. या नव्या नियमांमुळे एटीएममधून पैसे काढणे किंवा इतर कोणतेही व्यवहार करणे महागात पडणार आहे.

दरम्यान, ग्राहकांना त्यांच्या स्वतःच्या बँकेच्या एटीएममधून महिन्यातून पाच वेळा विनामूल्य पैसे काढता येणार आहेत. पाचपेक्षा जास्त वेळा पैसे काढले तरच ग्राहकांना अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत. तर इतर बँकांच्या एटीएममधून तीनवेळा विनामूल्य व्यवहार करता येणार आहेत. इतर एटीएमधून तीनपेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर त्यांनी अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने एका निवेदनाद्वारे, मोफत मर्यादेनंतर केलेल्या व्यवहारावर २१ रुपये शुल्क आणि जीएसटी भरावा लागणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी आधी २० रुपये आकारले जात होते. परंतु, आता या रकमेत वाढ करण्यात आली असून आता २१ रुपये आकरण्यात येणार आहेत.

त्याचप्रमाणे बँकांना प्रत्येक व्यवहारासाठी इंटरचेंज शुल्क वाढवण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारांसाठी हे शुल्क १५ रुपयांवरून १७ रुपये करण्यात आले आहे.