अन्न आणि औषध प्रशासन खात्याची कारवाई
राज्यातील काही औषधालये ‘एच १’ वर्गातील औषधांची योग्य पद्धतीने नोंद ठेवत नसल्याचे आढळून आल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने औषधालयांवर छापे घालण्यास सुरुवात केली असून संबंधित कायद्यातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने वास्को शहरातील दहा औषधालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्याची माहिती संचालक सलीम वेलजी यांनी दिली.वास्को शहरातील २३ औषधालयांची प्रशासनाने तपासणी केली आहे. वरील दहा औषधालयांतून ‘एच १’ वर्गातील औषधांची कशा पद्धतीने विक्री केली त्याचा हिशेब मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांना ताबडतोब स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. वास्को येथील दुहेरी खून प्रकरणाच्या चौकशीत खून करण्यापूर्वी झोपेच्या गोळ्यांचा गैरवापर झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे औषध प्रशासन खडबडून जागे झाले असून छापासत्र सुरू केले आहे. दरम्यान, औषध प्रशासनाने गेल्या दि. १ रोजी राज्यातील सर्व औषध विक्रेत्यांची बैठक घेऊन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासंबंधी आवश्यक सूचना केल्या. काही औषधालये मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे कसे टाळत आहेत, याचीही त्यांना अधिकार्यांनी बैठकीत माहिती दिली. सदर बैठकीत औषध विक्रेत्यांच्या संघटनेने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन सर्व औषधालये नियमांचे काटेकोरपणे पालन करीत असल्याचा दावा केला होता.