>> आरोग्य महासंचालक डॉ. गोयल यांच्याकडून स्पष्ट
>> प्रयोगशाळांत चाचण्या वाढवण्यावर भर
चीनमधील ‘एचएमपीव्ही’च्या संसर्गाची वाढत्या प्रकरणांमुळे जगभरात याबाबत चिंता व्यक्त केली जात असली तरी भारतीय आरोग्य सेवांचे महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी मात्र चिंतेचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. डॉ. गोयल यांनी, भारतात या व्हायरसच्या संसर्गाची फार प्रकरणे समोर आली नसल्याचे सांगितले आहे. तर केंद्र सरकारकडून सावधगिरीचा उपाय म्हणून प्रयोगशाळांत चाचण्यांची संख्या वाढवण्यात येणार असून या प्रकरणांचे वर्षभर निरीक्षण करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
एचएमपीव्ही विषाणू सर्व प्रकारच्या ऋतूंमध्ये वातावरणात असतो, परंतु हिवाळ्यात त्याचा प्रसार होण्याचा धोका सर्वाधिक असतो. हा एखाद्या सामान्य विषाणूसारखा असून तो श्वसन नलिकेला संसर्ग करतो. त्यामुळे सर्दीसारखे आजार होऊ शकतात. एका वर्षापेक्षा कमी वयाची मुले आणि ज्येष्ठांमध्ये याच्या संसर्गामुळे फ्लूसारखी लक्षणे पाहायला मिळू शकतात, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. डॉ. गोयल यांनी, यामुळे कोणताही गंभीर परिणाम होत नसल्याने फारशी चिंतेची बाब नाही. हिवाळ्याच्या काळात सर्दीच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. आपली आरोग्य यंत्रणा या स्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे म्हटले आहे.
केंद्र सरकारचे निवेदन
केंद्र सरकारने जारी केलेल्या एका निवेदनात श्वासोच्छवासाच्या आजारांच्या बाबतीत कोणत्याही वाढीला सामोरे जाण्यासाठी देश पूर्णपणे तयार आहे. या हंगामात आरएसव्ही आणि एचएमपीव्ही हे सामान्य इन्फ्लूएंझा विषाणू आहेत, ज्यामुळे चीनमध्ये फ्लूचे प्रमाण वाढत आहे.
सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेला चीनमधील परिस्थितीबद्दल वेळोवेळी अपडेट देण्यास सांगितले असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, शनिवारी या संदर्भात आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात जागतिक आरोग्य संघटना, आपत्ती नियंत्रण केंद्र, एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, आपत्कालीन वैद्यकीय मदत विभाग यासह अनेक तज्ज्ञ उपस्थित होते. या बैठकीत या प्रकारची अद्याप कोणतीही वाढ झालेली नाही असा निष्कर्ष काढण्यात आला.
चीनकडून स्पष्टीकरण
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी उत्तर भागामध्ये हिवाळ्यात श्वसन नलिकेच्या संसर्गाची अधिक प्रकरणे समोर येतात असे सांगून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हे आजार कमी गंभीर आणि कमी प्रमाणात पसरलेले आढळून येत आहेत असे सांगून त्यांनी चीनमध्ये प्रवास करणे सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.
एचएमपीव्ही विषाणू पहिल्यांदा 2001 मध्ये ओळखला गेला. एका डच संशोधकाने श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांच्या नमुन्यांमध्ये हा विषाणू शोधला होता. मात्र, हा विषाणू गेल्या 6 दशकांपासून अस्तित्वात आहे.
भारताला काळजीची गरज नाही
आरोग्य सेवा महासंचालक डॉ. गोयल यांनी मध्ये मेटापन्यूमोव्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे आणि तो गंभीर आहे, परंतु भारताने काळजी करण्याची गरज नाही. हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. हा सर्दीसारखा आजार आहे किंवा काही लोकांमध्ये फ्लू सारखी लक्षणे असू शकतात. विशेषतः वृद्ध आणि 1 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये, परंतु हा आजार खूप काळजी करण्याइतका गंभीर आजार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
2 वर्षांखालील मुलांना त्रास
एचएमपीव्ही हा आरएनए विषाणू आहे. जेव्हा विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णांमध्ये सर्दी आणि कोविड-19 सारखी लक्षणे दिसतात. त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होत आहे. यापैकी 2 वर्षांखालील मुलांना सर्वाधिक त्रास होतो. त्याची लक्षणे खोकला, ताप, नाक बंद होणे आणि घशात घरघर येणे यांचा समावेश आहे. एचएमपीव्ही व्यतिरिक्त, इन्फ्लूएंझा ए, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड -19 ची प्रकरणे देखील नोंदवली जात आहेत. त्याच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. खोकल्यामुळे आणि शिंकण्याने व्हायरस पसरण्याचा धोका जास्त असतो. जर विषाणूचा प्रभाव तीव्र असेल तर तो ब्राँकायटिस आणि न्यूमोनिया देखील होऊ शकतो. एकदा संसर्ग झाल्यानंतर त्याचे परिणाम 3 ते 5 दिवसांत दिसून येतात.
सामान्य आजार ः डॉ. गोयल
आरोग्य महासंचालक डॉ. गोयल यांनी, हा सर्दीसारखा आजार आहे किंवा काही लोकांमध्ये फ्लूसारखी लक्षणे असू शकतात. विशेषतः: वृद्ध आणि 1 वर्षाखालील मुलांमध्ये, परंतु हा इतका गंभीर आजार नाही की जास्त काळजी करण्याची गरज आहे अशी माहिती दिली.
डॉ. गोयल यांनी, श्वासोच्छवासातील विषाणू संसर्ग हिवाळ्यात होतो. आमची रुग्णालये आणि संस्था हे हाताळण्यासाठी तयार आहेत. बेड आणि ऑक्सिजनची उपलब्धता आहे. त्याला कोणत्याही विशिष्ट औषधांची आवश्यकता नाही कारण त्याच्या विरुद्ध कोणतेही विशिष्ट अँटीव्हायरल औषध नसल्याचे म्हटले आहे.
चीनचे शेजारी देश चिंताग्रस्त
एचएमपीव्ही या विषाणूमुळे आता चीनचे शेजारी देश या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. भारतीय आरोग्य महासंचालकांनी यासंदर्भात सध्या काळजी करण्यासारखे काहीही नसल्याचे स्पष्ट केले आहे. इंडोनेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी एक निवेदन जाही केलं आहे. त्यात चीनमध्ये इनफ्लुएन्झा ए आणि श्वसनाच्या आजाराशी संबंधित इतर विषाणूंबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. इंडोनेशिया, मध्ये एचएमपीव्हीच्या संसर्गावर लक्ष ठेवून आहे. हाँगकाँगच्या फ्री प्रेसने काही दिवसांपूर्वी एका रिपोर्टमध्ये हाँगकाँगमध्ये एचएमपीव्ही संसर्गाची काही प्रकरणे समोर आली आहेत मात्र त्यांची संख्या कमी असल्याचे सांगितले.