- कु. आकांक्षा अनंत नाईक,
कासारवर्णे
आई जाऊया ना गं कुठेतरी फिरायला… मला सुट्टी आहे, जाऊ या ना गं आई,” असा मी आईमागे कुठेतरी फिरायला घेऊन जा म्हणून सपाटा सुरू केला. शेवटी आई मला घेऊन तिच्या बहिणीकडे एक रात्र राहायला घेऊन जायला तयार झाली. मावशी गेली कित्येक दिवस आईला आपल्याकडे राहायला बोलावत होती, पण घरची कामे आणि संसार यामधून आईला उसंत मिळत नसे. पण त्या दिवशी मी मावशीकडे जाण्याची मोहीम फत्ते केली.
मी, रेखा (माझी धाकटी बहीण) व आई, आम्ही तिघीही मावशीच्या घरी गेलो. खूप दिवसांनी माहेराहून कोणीतरी आपली माणसे आलीत याचा आनंद मावशीच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता. मावशीने आपल्या नवऱ्याला सांगून घरगुती (गावठी) कोंबड्याचा बेत केला. त्याचबरोबर गोडधोड, मासळी व अन्य जिन्नसही बनवले होते.
मी, रेखा आणि आईनेही तृप्तीचे ढेकर देत जेवण फस्त केले. आम्ही त्यांच्या घरच्या मंडळीबरोबर एवढे एकरूप झालो की त्यांच्या घरी पहिल्यांदा आलो असे वाटलेच नाही. जेवण झाल्यानंतर आम्ही खूप गप्पागोष्टी केल्या. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यानंतर आमच्या गप्पागोष्टी एवढ्या रंगल्या की आम्ही भुताखेतांवर येऊन ठेपलो. गप्पा करता करता कधी रात्रीचा एकचा टोला झाला कळलेच नाही. आता डोळ्यांवर झापड येऊ लागली होती. आम्ही सर्वजण झोपायलो.
माझी आई व मावशी बाहेरच्या खोलीत झोपली व मी, रेखा व सुनैना (मावशीची मुलगी) आतील खोलीत एका कॉटवर झोपलो. खोली अगदी प्रशस्त होती. खोलीनजीकच स्नानगृह होते व कॉटजवळ मोठी खिडकी होती. खिडकीला पडदे लावले होते. त्या खिडकीतून रस्त्यावरील दिव्यांचा अंधुक प्रकाश आत डोकावत होता. त्या खोलीत निरव शांतता होती. थंडीचे दिवस असल्याने वातावरण अगदी मस्त होते. मी माझा फोन चार्गिंगला लावला व झोपायला गेले. एका बाजूला सुनैना झोपली, मध्ये रेखा व दुसऱ्या बाजूला मी.
मावशीने आम्हाला झोपवून दिवे बंद केले व खोलीतून जाताना खोलीचे दारही बंद करून घेतले. मला भरपूर झोप आली होती. डोळा कधी लागला हे कळलेच नाही. अचानक कुणाच्या तरी चाहुलीने मला जाग आली. मी डोळे उघडले. पाहते तर काय, एका बाईची मला सावली दिसली. ती बाई चालत चालत कॉटजवळच येत होती. माझी तर भीतीने गाळणच उडाली! काय करू आणि काय नको असे झाले. तरीही मी धीर एकवटून डोक्यावरून चादर ओढली. राम राम मला म्हणायचं होतं पण शब्द बाहेर फुटत नव्हते. मी बहिणीचा हात चाचपून घट्ट पकडला. ती गाढ झोपेत होती. डोक्यावर चादर असल्याने मला आता बाहेरचं काही दिसत नव्हतं. पण कुणीतरी माझ्या जवळ आहे याची जाणीव मला होत होती. मी हळूच माझी चादर डोक्यावरून काढली आणि हळूच डोळे उघडून पाहिले तर ती आकृती माझ्या जवळून नुकतीच दूर जात होती. पण खोलीतलं काहीतरी शोधत असल्यासारखं करत होती. ती आता पुन्हा माझ्याजवळ येत असल्याचे पाहून मी पुन्हा डोक्यावरून चादर घेतली आणि राम राम म्हणत राहिले. भीतीने माझी गाळणच उडाली होती. त्याचबरोबर घामाने अंग अगदी ओलेचिंब झाले होते. माझी स्थिती अर्धमेल्यासारखी झाली. तोच मोठ्याने आवाज झाला आणि टेबलावरील फुलांचा दस्ता खाली पडला. मावशी ओरडल्या, ‘आवय गे…’ मी डोक्यावरून चादर काढून मावशीला हाक मारली. तोच मावशीने होकार दिला आणि मी सुटकेचा निःश्वास सोडला. मावशीला विचारल्यानंतर समजलं की मघापासून तिचं डोकं दुःखत होतं म्हणून ती त्या खोलीत झंडू बाम शोधत होती. आमची झोपमोड होऊ नये म्हणून त्यांनी लाईट लावला नाही. ती काळोखातच बाम शोधत होती. शोधता शोधता त्या टेबलाला धडकल्या आणि मोठ्याने आवाज झाला म्हणून माझी धडगत, नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊक!