एक दिवस आधीच केरळात मान्सून दाखल

0
20

>> हवामान विभागाकडून जाहीर; गोव्यातही वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाच्या एक दिवस अगोदरच काल केरळमध्ये मान्सून अर्थात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाला. 31 मे रोजी मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मात्र, एक दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे.

केरळमध्ये मान्सून कधी दाखल होईल याची वाट गेल्या काही दिवसापासून देशातील शेतकरी पाहत होते. गेल्या वर्षी मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे काही राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी मान्सूनची वेळेत सुरू होईल की नाही यावरुन शेतकरी चिंतेत होते. देशातील तापमानातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यानंतर काल हवामान विभागाने केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केल्यानंतर देशातील शेतकरी सुखावला आहे.
मान्सून उत्तर-पूर्व भारत आणि केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. आठवडाभरात मान्सून गोवा आणि महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काल केरळ आणि ईशान्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये प्रवेश केला आहे.

साधारणत: दरवषर्भ मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होतो. यावर्षी मान्सून 31 मे रोजी केरळात येईल असा अंदाज हवामान विभागाने दिला होता; पण एक दिवस आधीच म्हणजे 30 मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला असून, पुढच्या प्रवासात गती असल्याचेही दिसत आहे.

गोव्यात मान्सून 4 ते 5 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सूनची वाटचाल अशीच सुरू राहिली, तर या तारखेपूर्वीच गोव्यात मान्सून दाखल होईल, असा अंदाज आहे. देशभरात यंदा चांगला मान्सून असणार आहे, असे भाकीत यापूर्वीच वर्तवण्यात आले आहे.