- माधुरी रं. शे. उसगावकर
(फोंडा)
संध्याकाळचं अर्ध्या तासाचं ध्यान हा एक नित्य कार्यक्रम अंगवळणी पडला. ध्यानाशिवाय चुकल्याचुकल्यासारखे वाटू लागले. आवड निर्माण झाली. जिथे आवड आहे तिथे सवड आहे म्हणतात हेच खरे.
प.पू. गुरुदेव एवं वंदनीय गुरुमॉंच्या असीम कृपेने अनुभूती लेखन करीत आहे. सर्वांना गुरुकृपेचा लाभ होवो, हीच आंतरिक इच्छा!
एप्रिल २००८मध्ये पोलीस ग्राउंड पर्वरी येथे प.पू. श्री शिवकृपानंद स्वामींचे आठ दिवसीय समर्पण महाशिबिर संपन्न झाले. या शिबिराला प्रत्यक्षरीत्या उपस्थित राहण्याचा योग मला आला.
१४ एप्रिलला फोंड्यात विश्व हिंदू परिषद सभागृहात समर्पण साहित्याचे प्रदर्शन भरवले होते. संध्याकाळी तिथून जात असता माझी नजर विश्व हिंदू परिषदच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या समर्पण पत्रकावर गेली. म्हटलं प्रदर्शन बघायला काय हरकत आहे? प्रवेश करताच कोण्या एका स्वामींचा फोटो, फुलांचा हार घातलेला आसनावर ठेवलेला दिसला. फोटोसमोर तेलाचा दिवा तेवत होता. नमस्कार करण्याचा पुसट विचारही मनाला शिवला नाही. मी तशीच सभागृहात पुढे गेले. माहितीसह भित्तीपत्रके लावली होती. स्वामींची विविध आभामंडलातील छायाचित्रे लावली होती. मी पूर्ण प्रदर्शन पाहिले. श्री. अनिकेत (दांडी आश्रमातील आजीवन साधक) पत्रकांबद्दल आवश्यक माहिती सांगत होता. शेवटी निघताना मी फोटोसमोर उभी राहिले व नतमस्तक झाले. ‘ताई तुम्ही पवित्र आत्मा आहात. पूर्ण प्रदर्शनी आपण भावार्थाने पाहिली’, अनिकेतचे उद्गार. मी किंचित स्मितहास्य केले. माझा तर बुवाबाजीवर बिलकुल विश्वास नव्हता व नाही.
दैनंदिन व्यवहार माझे नित्याप्रमाणे चालूच होते. पण अधूनमधून प्रदर्शनातील तसबिरीचे विचार मनात रुंजी घालू लागले. मी बळेबळेच विसरण्याचा प्रयत्न करत होते व ते शक्य व्हायचं. परंतु निवांत वेळेत पुन्हा त्यासंबंधाचे विचारचक्र फिरत होते. मला आश्चर्य वाटलं की ध्यानी मनी नसताना तत्संबंधी विचारशृंखला का निर्माण व्हावी?
१७ एप्रिलला शिबिराचा पहिला दिवस होता. माझ्या चुलत नणंदेचा, सौ. शुभाचा मला फोन आला की ती सत्संगाला (शिबिराला) जाते आहे. मलापण आपल्याबरोबर येण्याचे सूचित केले. या गोष्टीला घरच्यांची सहमती नसेल या नकारात्मक विचाराने माझी अवस्था त्रिशंकूप्रमाणे झाली. ‘दुसर्या दिवशी सकाळी हायस्कूलला जायचं. मला शक्य नाही.’ अशी सबब सांगून मी फोन खाली ठेवला. माझ्यावर एका हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेची जबाबदारी होती. पण मला राहवलं नाही. एक दिवस तरी जाऊन यावं असं वाटू लागलं. लगेच मी तिला फोन करून माझ्या येण्याचे कळवले. घरच्यांसमोर थोडं धाडस करून घायकुतीला येऊन तडकाफडकी निर्णय घेतला पण तो अमलात आलाच नाही. तरीही माझ्या मनातील गुरुदेवांची सूक्ष्माकृती पुसट का होईना अंतःचक्षुंसमोर तीच तसबीर दिसायची.
दुसर्या दिवशी नातेवाईकाचं लग्न पर्वरीच्या ‘मॅजेस्टिक’मध्ये होते. दुपारी लग्न करून मी संध्याकाळच्या शिबिराच्या प्रवचनात पर्वरीला हजर राहिले. राहण्याची सोय माझ्या माहेरी पर्वरीला झाली होती. परंतु मन घरी ओढ घेत होतं.
हिरव्यागार ताडपत्रीने आच्छादित भव्य सुशोभित मैदानावर हजारोंच्या सामूहिकतेत प.पू. श्री शिवकृपानंद स्वामींचे प्रवचन सुरू झाले. गुरुदेवांच्या साध्या सोप्या मराठमोळ्या भाषेतील बोल अंतरात्म्याला भिडले. गुरुतत्वाविषयी, संतुलित जीवनशैली, आध्यात्मिक चैतन्य… असे विविध शब्द कानावर पडत होते. परंतु त्यांचा खराखुरा अर्थ कळत नव्हता. पण प्रवचन ऐकण्यात एक वेगळाच आत्मिक आनंद मिळत होता. वाणीतून स्रोत वाहात होता. कधी रात्रीचे साडे-आठ वाजले त्याचा थांगपत्ताच लागला नाही.
महाशिबिरात फोंड्याच्या ‘विजया’ नावाच्या साधिका भेटल्या. त्यांच्या समवेत मी शिबिराचा लाभ घेतला. विशेष म्हणजे माझ्या यजमानांनी दोन दिवस प्रवचनाचा लाभ घेतला. प्रवचनानंतर थोडा वेळ ध्यान घेतलं गेलं जे मला नवीनच होतं. ध्यानाचे फायदे, गुरुमंत्राचा जप, योग्य वेळ, संलग्न कारणं सांगितली गेली. ध्यान झाल्यानंतर सौ. सावंतशी परिचय झाला. त्यांनी जवळीकतेने विचारपूस केली. ‘आता घरी कसं जायचं?’ मी त्यांनाच विचारलं. त्या म्हणाल्या, ‘काही काळजी करू नका. तुमची सोय होईल.’ मुख्य गेटच्या बाहेर येऊन आम्ही तिघी राहिलो. एवढ्यात एक चारचाकी गाडी थांबली. ‘फोंड्याला जातो, यायचं आहे का?’ पडत्या फळाची आज्ञा. श्रीमान श्रीमती पंत यांच्या गाडीतून आम्ही आरामात फोंड्याला पोहोचलो. ध्यानीमनी नसताना ही कुणाची कृपा म्हणावी? अर्थात साक्षात गुरुदेवांचीच!
सांगायचे म्हणजे मला शिबिराचा शेवटचा दिवसही लाभान्वित झाला. या दिवसातील संध्या माझ्या दृष्टीने मला पर्वणीच ठरल्या. स्वामीजींच्या अमृतवाणीने मनातील किल्मिश दूर होऊन गुरुदेवांच्या किमयेची अनुभूती आली.
चांगल्या कर्माचा ध्यास असला म्हणजे विघ्ने कशी नाहीशी होतात व मार्ग सुकर होतो याचा परिपूर्ण अनुभव आला. घरच्यांचा काही अंशी का होईना सक्रीय पाठिंबा मिळाला.
आठ दिवसांनंतर ४५ दिवस सेंटरवर सकाळी ७.०० वा. ध्यान करावे असे स्वामीजी सांगतात. २५ एप्रिलला सहजच प्रमुख आचार्य श्री. हेमंत रामाणींना फोन लावला. फोंड्यात जवळपास कुठे ध्यानकेंद्र असेल तर कळवावे. तेव्हा ते म्हणाले, ‘जवळचे ध्यानकेंद्र माहीत नसेल तर घरीच ध्यान केले तरी चालेल. पण ध्यान कर. वेळ टळलेली नाही.’ त्याप्रमाणे ध्यान झालं. मी महाशिबिरात ‘समर्पण मार्गदर्शिका’ ही पुस्तिका विकत घेतलीच होती.
दुसर्या दिवशी दुपारी मला अनुष्ठानच्या सौ. शुभाचा फोन आला आणि तिने जवळच्याच सेंटरबद्दल कळविले. तिथे मी गेले तर जीवन मॅडमनी मला केंद्राची पूर्ण माहिती दिली व मी प्रेरित झाले. चुटकीसरशी प्रश्न उलगडला. एकदा अनुष्ठान पूर्ण करून तर बघ. या पथावरील सर्व विघ्नं दूर होतील. शिबिर संपल्यानंतरच्या तिसर्या दिवसापासून ४५ दिवस मी सेंटरवर सामूहिक ध्यानसाधना केली. जीवनमॅडमनी आपल्या अनुभूतीच्या जीवनधारेतले माध्यमरूपी जीवनपुष्प फुलविले. वातावरणनिर्मिती झाली.
४५ दिवसांच्या अनुष्ठानात स्वामीजींना केलेली प्रार्थना साध्य होत गेली. सूक्ष्म रूपात गुरुशक्ती आमच्याबरोबरच आहे याची जाणीव होत होती. क्षमतेपेक्षा जास्त, अपेक्षेपेक्षा जास्त नियोजित सर्वकाही होत गेलं, ही अनुभूती पदोपदी येऊ लागली. सहज सुलभ छोट्या- मोठ्या समस्यापूर्ती होत गेल्या. प्रार्थना लिहून ठेवली होती. अनुष्ठान स्वामीजींच्या कृपेने पूर्ण झाले.
या अनुष्ठानानंतर मी अधिकृत माध्यम बनले. असाध्य गुरुकार्य साध्य होत होतं याची क्षण क्षण अनुभूती येऊ लागली. ध्यानमार्गातून कठीण प्रसंगाला डगमगून न जाता तोंड देण्याचे धारिष्ट्य निर्माण झालं.
संध्याकाळचं अर्ध्या तासाचं ध्यान हा एक नित्य कार्यक्रम अंगवळणी पडला. ध्यानाशिवाय चुकल्याचुकल्यासारखे वाटू लागले. आवड निर्माण झाली. जिथे आवड आहे तिथे सवड आहे म्हणतात हेच खरे. धैर्य, मेहनत व निश्चय यांचे फळ गोड असते यावर मनस्वी विश्वास बसला.
माझ्या आयुष्यात २००८च्या शिबिरापासून आजपावेतो समर्पण ध्यानधारणा हा एक अंगभूत घटक झाला. जय गुरुदेव! आपल्यावरही कृपेचा असाच अखंड वर्षाव होवो हीच गुरुचरणी शुद्ध प्रार्थना!