>> राज्यात नवे विक्रमी ५७० बाधित
>> दोघांच्या मृत्युमुळे बळींची संख्या ९१
राज्यात कोरोना विषाणू फैलावाची परिस्थिती गंभीर बनत चालली असून आत्तापर्यंतचे सर्वाधिक नवे ५७० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले. सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३४९१ झाली आहे. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या १०,४९४ एवढी झाली आहे. तसेच, आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे निधन झाले असून कोरोना बळीची संख्या ९१ झाली आहे.
राज्यातील सर्वच भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. ऑगस्ट महिन्यात दरदिवशी मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत.
१६ दिवसांत ५५ बळी
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. मागील १६ दिवसांत ५५ जणांचा बळी गेला आहे. काल गुरूवारी काणकोण येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्णाचे आणि आके मडगाव येथील ७३ वर्षीय पुरुष रुग्णाचे मडगावच्या कोविड इस्पितळात निधन झाले. कोरोना बळींमध्ये मुरगाव तालुक्यातील रुग्णांची संख्या जास्त आहे.
गोमेकॉत १०५ संशयित
बांबोळी येथील गोमेकॉच्या कोरोना खास वॉर्डात १०५ कोरोना संशयित रुग्णांना काल दाखल करण्यात आले. कोरोना संशयितांची संख्येत मोठी वाढ झाली आहे. आत्तापर्यंत कोरोना संशयित म्हणून २५५० जणांवर उपचार करण्यात आले आहेत.
गोमेकॉच्या प्रयोगशाळेत २४९६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ५७० नमुने पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. ७४० नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. आरोग्य खात्याने २६६१ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.
६९७२ कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह आणखीन २७१ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६९१२ एवढी झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रुग्ण होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारत आहेत.
पणजीत गंभीर स्थिती
पणजीत कोरोना गंभीर स्थिती निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. पणजीत काल नवे २२ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या १६७ झाली आहे.
सांतइनेज पणजी येथील एका मराठी वृत्तपत्राचे संपादक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पाटो पणजी येथील कार्यालयात काम करणारी युवती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. पाटो पणजी येथील एसबीआयच्या शाखेत काम करणारा करंजाळे येथील पुरुष कर्मचारी कोरोना बाधित झाला आहे. पणजी महानगरपालिका क्षेत्रात कांपाल, सांतइनेज, बॉक द व्हॉक, करंजाळे, भाटले, रायबंदर, मळा, मिरामार या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.
आल्तिनो येथील
१२ जण राजी
आल्तिनो पणजी येथील कोविड केअर सेंटरमध्ये जाण्यास तयार नसलेल्या १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मन वळविण्यास राज्य प्रशासन आणि महानगरपालिकेच्या अधिकार्यांना यश प्राप्त झाले आहे. आल्तिनो येथील १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोविड केअर सेंटरमध्ये जाण्यास बुधवारी नकार दिला होता. त्यामुळे आल्तिनो परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पणजीचे महापौर उदय मडकईकर, आयुक्त संजीत रॉड्रीग्स, उपजिल्हाधिकारी गुरूदास देसाई, तिसवाडीचे मामलेदार, पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांनी त्या १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मन वळविण्यात गुरूवारी दुपारी यश प्राप्त झाले.
गुजतर्फे सावधगिरीचे आवाहन
पणजीतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गोवा श्रमिक पत्रकार संघटनेने (गुज) आपल्या सदस्यांना दैनंदिन कामकाज करताना जास्त सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. पत्रकारांनी मास्क, सॅनिटायझर्स आणि सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
दाबे गाव कंटेनमेंट झोन
सत्तरी तालुक्यात दाबे हा गाव मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या गावात ६३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मडगावात ८ पाद्रींसह
१४ जणांना कोरोना
मडगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या क्लर्जी होममधील ८ पाद्रींसह १४ जणांना कोरानाची लागण झाली आहे. हे ठिकाण हॉस्पिसियु इस्पितळाजवळ आहे. ८ पाद्री, एक नन, ४ अटेंडंट व स्वयंपाकी बाधित झाले आहेत. काल दोन पाद्रींना कोविड इस्पितळात दाखल केले आहे. अन्य बाधितांना नुकतीच लक्षणे दिसू लागल्याने त्यांना होम क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. या केंद्रात काम करणार्या एक पाद्रीला उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉत दाखल केले होते. तिथेच कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जातो.