एकीचे बळ मिळते फळ!

0
31

योगसाधना ः 661, अंतरंगयोग- 247

  • डॉ. सीताकांत घाणेकर

कथेतील साळ प्राण्याच्या बुद्धीचा विचार केला तर त्यांनी थोडीशी बुद्धी व्यवस्थित वापरली. आणि आपण? छोट्याशा कारणामुळे, सामान्य मतभेदांमुळे लगेच वेगळे होतो. खरे म्हणजे मानवाला भगवंताने अप्रतिम बुद्धी दिलेली आहे. पण आज तो स्वार्थी व आत्मकेंद्री होत आहे.

सृष्टिकर्त्याने बनवलेले विश्व म्हणजे एक उत्कृष्ट कलाकृती आहे. त्या विश्वात पंचतत्त्वे/पंचमहाभूते- पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश हे मुख्य घटक आहेत. पृथ्वीवर पहाड, पर्वत, नाले, नद्या, समुद्र, वृक्ष-वनस्पती, फुले-फळे, जीवजंतू, कृमीकिटक, पशुपक्षी, प्राणी आणि अर्थातच अत्यंत बुद्धिमान व कर्तृत्ववान असा मानव आहे.
या सृष्टीचे कौतुक म्हणजे तिची विविधता. प्रत्येक जीव वेगळा. त्यांत एक प्राणी आहे साळ. आश्चर्य म्हणजे त्याच्या अंगाला अनेक तीक्ष्ण काटे असतात. बालपणी या प्राण्याची चित्रे बघितली की जिज्ञासा वाटायची की देवाने यांना असे काटे का बरे दिले असतील?

वय वाढत गेले तसे कळले की हे काटे त्या प्राण्याच्या संरक्षणासाठी! दुसरे जनावर जर त्याच्यावर हल्ला करायला आले तर ही साळ म्हणे लगेच ते तीक्ष्ण काटे सगळ्या बाजूंनी सोडते, त्यामुळे तिच्या जवळ कुणीही जायला धजत नाही. शिकारीदेखील त्याची शिकार करताना म्हणे दृष्टिआड राहून त्याच्यावर हल्ला करतात. हा मुद्दा कळल्यावर भगवंताच्या कर्तृत्वशक्तीबद्दल कौतुक वाटते. विविध प्राण्यांना संरक्षणासाठी विविध आयुधे त्याने दिली आहेत. उदा.

  • सिंहाला तीक्ष्ण दात व टोकदार नखे.
  • सर्पांना दोन पोकळ नळीसारखे दात. त्यातून ते विष ओकतात.
  • पक्ष्यांना चोच.
  • बेडूक म्हणे पकडल्यावर लगेच लघवी करतो. ती जिथे अंगावर पडते, तिथे लगेच खाज सुरू होते व पकडणारा बेडकाला सोडून देतो.
    हे सर्व लिहिण्याचा प्रयत्न यासाठी की साळ या प्राण्याबद्दल तरुणपणी वाचलेली गोष्ट आठवली. गोष्ट अशी-
    कुणी एकेकाळी या साळी एकत्र आनंदाने राहत होत्या. पण अचानक हवा बदलली व कडाक्याची थंडी सुरू झाली. एवढी जबरदस्त की काही वृद्ध व तरुण प्राणी मरून गेले. इतरांना ती थंडी सोसवेना. स्वरक्षणासाठी एक चांगला उपाय शोधण्याच्या उद्देशाने त्यांच्यातील धुरिणांनी सर्वांची एक बैठक बोलावली. त्यात वेगवेगळ्या उपायांबद्दल चर्चा सुरू झाली. तद्नंतर असे ठरले की सर्व साळींनी एकमेकांच्या अगदी जवळ अंगाला अंग टेकवून बसायचे, झोपायचे. सर्वांना कल्पना फार आवडली. आपणदेखील तसेच करतो ना? एकमेकांच्या अंगाच्या उबेमुळे थंडी वाजणे थोडे कमी होते. उदा. आई व बाळ.

लगेच उपाय अमलात आणला गेला. पण सबंध दिवस-रात्र एकाच स्थितीत न हलता राहणे म्हणजे अगदीच अशक्य व्हायला लागले. प्रत्येकजण स्वतःला आराम मिळेल त्याप्रमाणे थोडा इकडे-तिकडे हलायला लागला. पण त्यामुळे काय झाले? एकमेकांचे तीक्ष्ण काटे त्यांना टोचायला लागले. जखमा व्हायला लागल्या. यामुळे समस्या उद्भवली ती म्हणजे थोडे बाजूला सरले तर थंडी वाजायला लागे. नव्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी म्हणे परत एकदा आपत्कालीन बैठक बोलावली गेली. चर्चेला सुरुवात झाली. त्यातून दोन उपाय सुचवले गेले.

  1. पूर्वीसारखे वेगळे राहायचे म्हणजे जखमा होणार नाहीत. पण काहीजण मृत्युमुखी पडू शकतात. 2. एकत्र यायचे आणि जखमा झाल्या तरी स्वतःच्या अस्तित्वासाठी त्या सोसायच्या.
    शेवटी असे ठरले की प्राण्याचे अस्तित्व महत्त्वाचे आहे म्हणून जखमा सोसायच्या, पण एकत्र राहायचे.
    आता कथेतील सत्यसत्यता पाहायची नसते तर त्यातून बोध घ्यायचा असतो.
    कौतुक वाटते की एवढासा छोटासा नगण्य प्राणी पण विचार कौतुकास्पद आहेत. त्या प्राण्याच्या बुद्धीत असा विचार येणे म्हणजे थोडीशी बुद्धी त्यानी व्यवस्थित वापरली. आणि आपण? छोट्याशा कारणामुळे, सामान्य मतभेदांमुळे लगेच वेगळे होतो. खरे म्हणजे मानवाला भगवंताने अप्रतिम बुद्धी दिलेली आहे. पण आज तो स्वार्थी व आत्मकेंद्री होत आहे.
    पशू व मानवाच्या बुद्धीच्या संदर्भात एक छान बोधदायक श्लोक आठवला. आहारनिद्राभयमैथुनंच सामान्यमेतत्‌‍ पशुभिर्नराणाम्‌‍।
    धर्मो हि तेषामधिको विशेषः धर्मेण हीनाः पशुभिः समानाः॥
  • आहार, निद्रा, भय, मैथून या गोष्टी मानव व पशूमध्ये समानच आहेत. पण मानवाला बुद्धीची विशेष देणगी आहे. बुद्धीशिवाय मानव पशूसारखाच आहे. खरेच, भगवंताने माणसाला उच्च बुद्धी दिलेली आहे. त्यामुळे त्याच्यापासून फार वेगळी अपेक्षा आहे.
    साळीच्या गोष्टीच्या संदर्भात विचार केला तर लक्षात येते की आजच्या या धकाधकीच्या दिवसांत मानवाने शक्य तो एकत्र राहायला हवे. मग ते कुटुंब असो, समाज असो, गाव-शहर असो, जिल्हा असो, राज्य असो, देश असो अथवा विश्व असो.

विविध संकटांचा सामना करायचा असेल तर आपण एकत्रच राहायला हवे. ते पाहिले तर हे ज्ञान सर्वांना आहे. पण म्हणतात ना- ‘व्यक्ती तितक्या प्रकृती!’ असे असल्यामुळे अनेक लहानमोठे मतभेद होतात. अशावेळी सद्सद्विवेकबुद्धीचा वापर न केल्यास भयानक मतभेद होतात. परिस्थिती चिघळते व माणसे वेगळी होतात. उदा.

  1. संयुक्त कुटुंब ः आधी संयुक्त कुटुंबे आनंदाने, गुण्यागोविंदाने राहत असत. मतभेद होत नसत असे कुणाचेही म्हणणे नाही. पण सहनशक्ती चांगली होती. एकामेकांना समजून घेण्याची पद्धत होती आणि सर्वजण सांभाळून घेत असत. म्हणजेच साळीसारखे एकत्र राहिल्याने जखमा होत असत, पण अस्तित्वाचा प्रश्न असल्यामुळे सांभाळून घेणे आवश्यक वाटत असे. बुद्धीचा हाच सदुपयोग होता.
  2. विभक्त कुटुंब ः एकत्र कुटुंबात मतभेद व भांडणे होतात म्हणून विभाजित कुटुंबाची पद्धत आली. म्हणजे पती-पत्नी राजाराणीसारखी आणि एक-दोन मुले. पण दुर्भाग्याने इथेदेखील मतभेद शिरले. मायेचा प्रभाव! पती-पत्नीची भांडणे व लहानशा कारणावरून घटस्फोट. मग मुलांची अवस्था भयानक. अनेकवेळा पालक व पाल्य यांचे मतभेद झाल्यामुळे घराची शांतता बिघडते.
  3. समाज, गाव, शहर, राज्य ः येथेदेखील तशाच घटना- वर्ण, धर्म, वंश, सांपत्तिक स्थिती यामुळे लढाया.
  4. राष्ट्र ः यासंदर्भात विविध उदाहरणे आहेत. भारत देशाची झालेली तीन राष्ट्रे- हिंदुस्तान, पाकिस्तान, बांगलादेश. आखाती देश व युरोप यांतील लढाया. इस्रायल- पॅलेस्टाइन- हमास. युक्रेन- रशिया. येथेदेखील एक कौतुकास्पद घडलेली घटना म्हणजे पूर्व व पश्चिम जर्मनीची. एकत्र मीलन व एक राष्ट्र. ते बुद्धिमान मानव आहेत.
    हा विषय फार मोठा आहे. पण मुख्य मुद्दा म्हणजे आज मानवाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. विचार करण्याची वेळ आली आहे. जखमा की अस्तित्व ः काय आवश्यक, काय महत्त्वाचे?
    शास्त्रशुद्ध योगसाधनेमध्ये एकत्रीकरण करून मानवी अस्तित्व टिकवण्याची ताकद आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून 2015 पासून सुरू झाला त्यावेळी ध्येय होते- समभाव व शांतीसाठी योग. घोषवाक्य तर दरवर्षी बदलते. या वर्षी आहे- वसुधैव कुटुम्बकम्‌‍.
    मला कौतुक वाटते की जे कुणी ही ध्येयवाक्ये शोधून काढतात त्यांना योगशास्त्राचे उच्च तत्त्वज्ञान नक्की ठाऊक आहे. गरज आहे ती पालनाची. बोलणे तसे आचरण करण्याची. मानव व सृष्टी यांच्या अस्तित्वासाठी याची अत्यंत गरज आहे.