एका संघर्षाची दुसरी गोष्ट!

0
142

– लाडोजी परब
लोकशाहीमध्ये निवडणुकीचे राजकारण हे इतर सर्वच व्यवहारांचे केंद्र असते. त्याचा प्रभाव आणि परिणाम बाकीच्या संस्थांवर होत असतो. सत्तेसाठीची ओंगळवाणी स्पर्धा, अडेलतट्टू भूमिका, विधिनिषेधशून्य चाली आणि प्रतिचाली यांचा नकारात्मक संदेशच या निमित्ताने जात असतो. आपण यातून निव्वळ मित्र वा विरोधी पक्षच नाही, तर लोकशाहीतल्या निकोप स्पर्धात्मकतेवरच घाला घालत आहोत याचे भान महाराष्ट्रातल्या कुठल्याच नेत्याला राहिलेले नाही.
सिंधुदुर्गातील राजकारण यापेक्षा वेगळे नाही. शिवसेनेचे दीपक केसरकर, वैभव नाईक, भाजपचे आ. प्रमोद जठार यांनी राणे व कॉंग्रेसशी टक्कर देण्याची केलेली तयारी, आ. विजय सावंत यांनी राणेंविरोधात पुकारलेले बंड, कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचे घड्याळ आणि त्यानंतर भाजपचे कमळ हाती घेतलेल्या राजन तेली यांना कोंडीत पकडण्याचा चाललेला प्रयत्न या सर्व गोष्टींच्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्गातील राजकारण तापले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत तिन्ही मतदारसंघात बंडखोरी झाली तरीही आघाडी, युतीचा धर्म पाळला गेला. कॉंग्रेसच्या रवींद्र फाटक आणि आ. प्रमोद जठार यांच्यात लढत झाली. या ठिकाणी कुलदीप पेडणेकर यांनी बंडखोरी केली होती. कुडाळ मतदारसंघात काही वेगळी परिस्थिती नव्हती. पालकमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात सेनेने वैभव नाईक यांना रिंगणात उतरविले होते. त्यामुळे ही निवडणूक त्यावेळी एकतर्फीच झाली. सावंतवाडी मतदारसंघात शिवराम दळवी आणि दीपक केसरकर यांच्यात लढत झाली होती. राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रवीण भोसले यांनी यावेळी बंड केले. असे असूनही आघाडीचा धर्म मानून राणेंनी केसरकर यांना साथ दिली. ती परिस्थिती आता राहिलेली नाही.
मध्यंतरीच्या कालखंडात अनेक संघर्षात्मक घडामोडींनी जिल्हा हादरला. लोकसभा निवडणुकीत दीपक केसरकर यांनी पुकारलेल्या बंडामुळे सेनेच्या विनायक राऊत यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली, तर दुसरीकडे नारायण राणेंना स्वत:च्या मुलाची झालेली हार जिव्हारी लागली.
यावेळी सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर, शिवराम दळवी, परशुराम उपरकर, राजन तेली रिंगणात उतरत असल्याने संभ्रमावस्था आहे. कणकवलीतून आ. प्रमोद जठार यांनी शिवसेना, आरपीआयच्या मदतीने तयारी चालवली आहे. त्यांच्या विरोधात नीतेश राणे आहेत. आणि कॉंग्रेसचे विजय सावंत अपक्ष लढत आहेत. कुडाळ मतदारसंघातील निवडणूक तशी सोपी नाही. वैभव नाईक यांनी गेल्या पाच वर्षांत येथे जबरदस्त मोर्चेबांधणी केली. गेल्या लोकसभा निवडणुकीत २२ हजाराने कॉंग्रेस या मतदारसंघात पिछाडीवर होती. त्यामुळे राणेंसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. पहिल्यांदा राष्ट्रवादीत आणि आता भाजपमध्ये दाखल झालेल्या आणि राणेंपासून फारकत घेतलेल्या त्यांचा अत्यंत विश्‍वासू सहकारी राजन तेली यांनी सावंतवाडी मतदारसंघात यापूर्वीच जनमत अजमावले. ग्रामपातळीवरील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या गराड्यात सध्या ते दिसतात. त्यामुळे केसरकर यांना सुद्धा एकहाती निवडून येण्याची शक्यता धूसर आहे. तेली राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर भाजपचीही साथ त्यांना मिळाली आहे.
दुसरीकडे केसरकर यांच्यावरही राणे यांचा राग आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना- भाजप युती तुटल्यानंतर जो तो आपले भवितव्य अजमावत आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराची समाजातील प्रतिष्ठा आणि जनमत कौल या निवडणुकीतून दिसून येईल. केसरकर यांना रोखण्यासाठी सेनेच्या सुरेश दळवींना राष्ट्रवादीकडून तिकीट देण्यात आली आहे. कॉंग्रेसने बाळा गावडे यांना उमेदवारी दिली असली तरीही केसरकर यांना रोखण्यासाठी राणेंची ही खेळी असल्याचे बोलले जाते.
लोकसभा निवडणुकीतील पराभव, नारायण राणेंनी केलेले आत्मपरीक्षण तरीही विधानसभा निवडणुकीतून स्वत:ला सावरण्याचे त्यांचे चाललेेले प्रयत्न यातून राजकीय सारीपाट रंगणार हे नक्की. दहशतवादाचा मुद्दा पुढे करून दीपक केसरकर यांनी आणलेली लाट सध्यस्थितीत काहीशी ओसरली आहे. पक्षापेक्षा व्यक्ती आणि विचार अशी कुजबुज मतदारांच्या कानात होत आहे. लोकसभा निवडणुकीतील चित्र आणि आत्ताची परिस्थिती यात खूपच फरक आहे. गेल्या दोन वर्षांपासून सिंधुदुर्गचे राजकारण ढवळून निघत आहे. वेंगुर्ला नगरपालिका निवडणुकीपासून खर्‍या अर्थाने नारायण राणेंच्या अस्तित्वाला सुरुंग लावण्यात आला. त्यावेळी दहशतवाद हा एकच मुद्दा मतदारांसमोर ठेवण्यात आला. याचा फायदाही विरोधकांना झाला. पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या काही निवडणुकांत त्यावेळी राष्ट्रवादीने बाजी मारली. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत दीपक केसरकर आणि त्यांच्या समर्थकांनी राणेंना टार्गेट केले. कॉंग्रेसचा प्रचार करण्यास विरोध केला. आणि सेनेच्या विनायक राऊत यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणले. मध्यंतरीच्या कालखंडात नारायण राणेंनी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठीवर दबावतंत्राचा अवलंब करून मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी फिल्डिंग लावली. पण यावेळीही त्यांचा आततायीपणा आड आला. पृथ्वीराज चव्हाण यांची खुर्ची शाबूत राहिली. एक पाऊल मागे जात नारायण राणेंनी कॉंग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे प्रचारप्रमुख पद मिळवले. आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा चंग बांधला. त्यांचे सारे लक्ष सिंधुदुर्गात आहे. कारण येथे पिता, पुत्र आता स्वत:चे भवितव्य अजमावत आहेत. निवडणुकीत विकासाच्या मुद्यांपेक्षा शत्रूंना नामोहरम करणे आणि स्वत:चे अस्तित्व सिद्ध करणे हा एकमेव उद्देश येथील उमेदवारांचा आहे. राणेंचे दुखावलेले कार्यकर्ते बाजूला झाले असले तरीही ते उघडपणे राणेंवर प्रहार करीत नाहीत. एकमेव केसरकर यांनी राणेंवर टीकासत्र सुरू ठेवले असले तरीही अनेक जण या मतदारसंघात गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. सिंधुदुर्गचा सर्वांगीण विकास करणार, अशी मतदारांना खात्री करून दिली जात आहे. मात्र येथील मतदार इतकेही दुधखुळे नाहीत. प्रत्येकवेळी परिवर्तनाचे बीज येथे रोवले गेलेले आहे. जिल्ह्याचा विकास कसा करणार, आणि त्यासाठी कोणत्या योजना राबविणार यासाठी ठोस कार्यक्रम कुणाकडे नाही. लोकसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याच्या घोषणा होत होत्या. परंतु इतकी वर्षे सत्ता असूनही जिल्ह्याला मानाचे मंत्रिपद मिळूनही रोजगाराच्या बाबतीत जिल्हा मागास राहिला. नवीन कंपन्या सोडाच पण असलेल्या कंपन्या बंद पडल्या. त्यात रेडीतील टाटा स्टील किंवा सातार्डा येथील उत्तम स्टीलबाबत चाललेली चालढकल ही उदाहरणे डोळ्यासमोर आहेत. त्यामुळे घोषणांच्या या पावसात मतदार यावेळी भिजणार नाहीत, हे नक्की. तरीही प्रत्येकाची प्रतिष्ठा येथे पणास लागली असताना मतविभागणी होऊन मोठा फटका बसणार हे नक्की. पक्षाचे बडे नेते सिंधुदुर्गात सभा घेत आहेत. नुकतीच नितीन गडकरी यांची सभा झाली. गोव्यातील आमदार, मंत्रीही सिंधुदुर्गात भाजपच्या प्रचारात गुंतले आहेत. केसरकर, तेली, उपरकर, गावडे, दळवी अशा पंचरंगी लढतीमुळे हा खरा कसोटीचा काळ आहे.