एका बीजापोटी

0
22
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

आज भवताल भयग्रस्त… मुका मुका का झाला आहे? आज धरित्रीचा कलश काठोकाठ का भरला जात नाही? सृष्टीच्या मूळच्या रंगविभ्रमांची आज राख का होऊ घातलेली आहे? आज दऱ्याखोऱ्या, माळराने, सागर, पुळणी, खाड्या, डोंगर आणि शिखरे का आक्रंदन करताहेत?

बालपणापासून मला निसर्गाविषयी ओढ. सकाळी उठल्याबरोबर दरवाजा उघडताच घरासमोरची विस्तीर्ण शेते दिसायची… दूरवरचा उत्तुंग डोंगर दिसायचा… शिवाय आमच्या घराला लगटून छोटी दोंगुर्ली होती. ‘माजाळेचॉ भोळॉ’ त्याचे नाव… त्याच्या पलीकडे हिरव्या रंगाच्या विविध छटा असलेल्या डोंगराची अवर्णनीय शोभा लक्ष वेधून घ्यायची. त्याचे नाव आहे ‘परंगरो.’ मे महिन्याच्या सुटीत त्याच्यावर चढून जाणे आणि चारे, चुन्ने, करवंदे फक्त करणे ही होती आमची बालपणापासूनची परंपरा… हा रानमेवा साठवावा कसा तर चाराच्या पानांच्या द्रोणात किंवा कुंभ्याच्या पानांच्या द्रोणात… कोणे एकेकाळी त्या डोंगरावर जनावरांची शिकार करण्यासाठी वार्षिक ‘भोंवडी’ व्हायची… या हिरवाईच्या आसमंताकडून येणारा लाल मातीचा नागमोडी रस्ता आमच्या घराकडून जायचा… या निकटच्या सान्निध्यामुळे निळ्या आभाळाप्रमाणे हिरव्यागार सृष्टीविषयीचं ममत्व वाढत गेलं… कुतूहल जागृत झालं. वयाची सोळा-सतरा वर्षं या वातावरणात घालविली… निसर्ग सखा झाला… सुख-दुःखाची स्पंदनं ऐकवायला तो अधिक जवळचा वाटायला लागला… एखाद्या झाडाच्या सावलीत विसावलो की साऱ्या व्यथा दूर व्हायच्या. शिवाय मनातील भावना उत्कटतेने व्यक्त करायला हाकेच्या अंतरावर समुद्र होता… त्यांची पुळणी लगतच्या डोंगरकपाऱ्यांवरून चंद्रकोरीसारखी दिसायची… तिची महिरप मोराप्रमाणे पिसारा फुलविलेल्या हिरव्यागार आणि निळ्याशार नारळीवृक्षांची… सर्वत्र विसावलेल्या काळ्या नौका.
त्या काळातील क्षणतरंग पुनरुज्जीवित होतात… जननान्तर सौहार्दाच्या मधुर आठवणी पुनः पुन्हा जाग्या होतात… मनाचे सांदीकोपरे उजळून निघतात. पर्जन्याच्या सरी कोसळतात तेव्हा त्यावेळची ओलेती धरित्री… टपोरे थेंब अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या वृक्ष-वल्लरी. मधुर रवानं अन्‌‍ आनंदी वृत्तीनं वातावरण भारावून टाकणारे पक्षी आणि रंगविभ्रमांची फुलपाखरं डोळ्यांसमोर साकार होतात… ही चित्रलिपी कुणाची? याचा कुंचला कुठला? याचे रंग कुठले? हे प्रश्नोपनिषद मनात सुरू होते. ‘गंधवती पृथ्वी’ आणि ‘शब्दगुणकं आकाशम्‌‍’ यांच्या गुणसंगमातून निर्माण झालेल्या या लावण्यमय सृष्टीकडे टक लावून पाहताना डोळे निवतात. श्रुती धन्य होतात. नासिकरंध्रं तृप्त होतात. अंगागांचा अणुरेणू मोहरून येतो आणि आत्म्याची रसना करून या चिरसौंदर्याचे आकंठपान करावेसे वाटते. पण हे सारे सोयीसाठी बोलायचे. सृष्टीशी तन्मय होताना आपण सारे शब्दातीताची अनुभूती घेत असतो. आपली सविकल्प समाधी लागत असते. शरीर असते लौकिकात पण मन असते अलौकिकात… पार्थिवतेच्या किनाऱ्यावर अजूनही आपण वर उचलले जातो हे खरे.

हा सृष्टीचा चमत्कार कसा घडला? कोठून घडला? तर एका बीजातून! तिळाएवढ्या, मोहरीएवढ्या बीजात एवढी अमर्याद, असीम शक्ती! पक्ष्याच्या विष्टेतून पडलेलं बीज जमिनीत रूजतं. कालांतराने लालस पोपटी पालवी धरते… दिसामासी वाढत जाते… कोवळ्या कांतीचे खोड दाठर होते… पोपटी पालवीबरोबर सोनेरी, तांबूस छटाही त्याच्या शेंड्यावर दिसायला लागतात… देखणे रूप, प्रचंड विस्तार, शिल्पाची भव्यता… मनुष्यमात्रांना, पशु-पक्ष्यांना शांतकाय करणारा हा महावृक्ष. तो पिंपळवृक्ष… अस्वस्थ वृक्ष… उत्पत्ती, स्थिती आणि लय या सृष्टिचक्राचं प्रतीक जणू… केवढा महान आशय हा महाकाय वृक्ष आपल्याला पुरवतो. निळ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर ही हिरवाईची चित्रलिपी किती अप्रतिम वाटते! कुसुमाग्रजांच्या ‘आकाशाचे ओझे’ या गद्यकाव्यातील चिमणी पिंपळावर बसून आकाशाचे ओझे आपल्या पंखावर उचलून धरते.
आणि पिंपळवृक्षाचा सहोदर वटवृक्ष. त्याचे बीज ते केवढे? लालसर वर्णाचे… किंचित पिवळ्या वर्णाचा शिडकावा असलेले… त्यातून त्याची एवढी प्रचंड निर्मिती? वाल्मीकींच्या रामायणाएवढी? व्यासांच्या महाभारताएवढी? ज्ञानदेवांच्या भावार्थदीपिकेएवढी? एवढ्यावर ही शृंखला थांबणारी नाही… या वटवृक्षाला पुनः पारंब्या जमिनीत रूजणाऱ्या…. मातीच्या ओलाव्याशी नाते सांगणाऱ्या. त्यांचा प्रवाही आकार आणि विराट पर्णसंभार! आकाशाशी नातं दृढ करणारा… प्रकाशाशी हृदयसंवाद करणारा. एखादी व्यक्ती विराट शक्तिनिशी वावरायला लागली म्हणजे ती वटवृक्ष होते… आधारवड होते… वृक्षांचे आणि माणसांचे हे असे जैविक नाते!

छोट्या बीजातून मोठा वृक्ष होण्याची ही प्रक्रिया न्याहाळताना मला संवेदनक्षम वयात वाचटलेली शांताराम आठवले यांची ‘एकलें बीज’ या कवितासंग्रहातील ‘एकलें बीज’ या कवितेतील ओळी आठवतात ः
आधीं बीज एकलें
बीज अंकुरलें रोप वाढलें
एका बीजापोटीं, तरू कोटी
कोटी जन्म घेती सुमनें फळें
एकुलते एक बीज…. त्याचं मातीत रुजणं… ते अंकुरणं… त्याचं रोप होणं… त्याची वाढ होणं… त्याचा वृक्ष होणं या प्रक्रियेचा वेध कवीनं मिताक्षरांमधून घेतलेला आहे… एका बीजापोटी कोट्यवधी वृक्ष निर्माण करण्याची अमर्याद शक्ती असते… विश्वाचा विस्तार त्यात समावलेला आहे हे त्याने सूचित केलेले आहे… अर्थवलय अधिकाधिक विस्तारत जातील असा आशय शांताराम आठवले यांनी या कवितेतून मांडलेला आहे. शेवटी तर हाच आशय प्रतीकात्मतेत परिणत केलेला आहे… एकमेव आणि अद्वितीय अशा ब्रह्मतत्त्वाशी त्यांनी त्याची सांगड घातली आहे… वस्तुजाताशी संबंध दर्शवून गहन विषय सोपा कसा करता येतो याचं हे उत्तम उदाहरण.
व्यापुनि जगता तूंहि अनंता
बहुविध रूपें घेसी, घेसी
परी अन्ती ब्रह्म एकलें॥
या एकल्या बीजाच्या विस्ताराचा विचार करताना अनुभवलेल्या अनेक क्षणांची संस्मरणे मनात जागी झाली. भावसंदर्भ जागे झाले… राष्ट्रीय निर्माणपर्वात ऊर्जायन उभं करणारे प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत आठवायला लागले.
वृक्षांमध्ये जशी जीवनदायिनी शक्ती असते; तशीच ती धान्याच्या रोपट्यांमध्ये असते. पर्जन्य आणि सर्जन यांचा अतूट अनुबंध… पर्जन्यराशी कोसळतात; तेव्हा शेतकऱ्याच्या आनंदाला पारावार नसतो. त्याचे डोळे आकाशाकडे लागलेले असतात. अखेर करुणाघनाची कृपादृष्टी होते. धुवांधार पावसात पृथ्वी चिंब होते. तिची असोशी संपते… ती सर्जनोत्सुक असते…
पावसाळा सुरू झाला रे झाला… शेतकऱ्यांना नांगरणीची घाई होते. राबणे आणि अधिक राबणे हा त्यांचा वसा. नांगरणी… निंदणी… कोळपणी… मळणी हे त्यांचे जीवितचक्र… हे क्रमविकासाचं सूत्र. जमिनीचा राब करून ती चांगली नांगरली जाते… शेतात बीज पेरल्यापासून जमिनीची मशागत केली जाते. बीजाचा अंकुर होतो… मग रोप… मग दुधावर आलेलं शेत… कालांतराने हेमगर्भासारखी कणसं धारण करणारी शेतं…. पिकल्या धानाचा आसमंतात लहरीरूपानं पसरणारा सुगंध… पुष्टी आणि तुष्टी यांचा मनोहर स्वरमेळ…

  • मूलसूत्र एकच… एकाच मूलबीजाचा झालेला प्रचंड विस्तार… आठवणींची अनेक पानं जेव्हा उलगडू लागतो, तेव्हा बालपणापासूनची ही अनुभवलेली चित्रे दृग्गोचर होतात… त्याच काळात अभ्यासाचीही गोडी लागलेली… दा. अ. कारे यांची शालेय अभ्यासक्रमात असलेली ‘भाताचे रोप’ ही कविता आठवते… तिच्यातील काही ओळी आठवतात ः
    लव झुळुकेने थरथरती
    किसलय-कोमल तव पातीं
    वरी धरेंतुनि परि सरती
    सलील निर्मल सुन्दर तीं!
    मातीचे थर केविं तरी
    दूरी सारिसी मृदुल करीं!
    कोमलतेमधिं तुझ्या कसें
    भेदकपण हें लपुनि असे?
    वृक्ष-वनस्पतीच्या बीजाचा विकास हा मानवी संस्कृतीच्या विकासाशी निगडित आहे… या नात्याचे धागे जुळवत जाणे, त्यासंबंधी चिंतन करणे हा एक आनंदानुभव… अन्‌‍ आनंदानुभूतीतही. सहजगत्या आदिमतेच्या अंतरंगाचा आपण शोध घेत असतो… संस्कृतीचे सारे पाझर तिच्या मुळाशी असतात आणि पालवीची दिशा प्रकाशमान क्षितिजाकडे असते… ओलावा आणि प्रकाश वर्धमान वृक्षाला आवश्यक असतात. आदितत्त्वाचा मूळ गाभा शोधताना पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा विचार सर्वप्रथम येतो… या मूलभूत घटकांच्या आंतरिक नात्यामुळे, निरंतर साहचर्यामुळे आणि एकात्मतेमधून सर्वश्रेष्ठ आनंदनिधानाचा आपण निरामय आस्वाद घेत असतो… हा समतोल नाहीसा झाला तर विश्वलयीमध्ये कोलाहल निर्माण होतो… म्हणूनच वृक्षगान आणि वृक्षभान सुटता कामा नये. ते आहे काय आज आपल्याकडे?
    आज भवताल भयग्रस्त… मुका मुका का झाला आहे? आज धरित्रीचा कलश काठोकाठ का भरला जात नाही? सृष्टीच्या मूळच्या रंगविभ्रमांची आज राख का होऊ घातलेली आहे? आज दऱ्याखोऱ्या, माळराने, सागर, पुळणी, खाड्या, डोंगर आणि शिखरे का आक्रंदन करताहेत? आज वडवानल एकाएकी का पेटताहेत? मुक्त नभांगणातील दिव्य आनंदाची प्रभा आज का झाकोळली गेली आहे? आज दुर्गंधीयुक्त वाताने आसमंत का गुदमरलेला आहे? आज समुद्रकिनारे का उसासे टाकत आहेत? ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें।’ म्हणणाऱ्या तुकारामांचा अभंग आज दबल्या आवाजात का म्हटला जातोय? अशा या अंधारात प्रकाशाचे दान कोण कुणाला देईल?
    आपल्या समाजातील संस्कृतीच्या श्वास-निःश्वासांसाठी आणि सर्जनशील अभिव्यक्तीसाठी पु. ल. देशपांडे चिंताग्रस्त व्हायचे. ते म्हणायचे ः
    “वृक्षसंस्कृतीऐवजी आज यंत्रसंस्कृती वाढू लागल्यामुळे आता आपली भाषासुद्धा बदलेल.” तेव्हा आतातरी ‘शुद्ध बीजापोटीं फळें रसाळ गोमटीं’ हा तुकारामांचा संस्कृतिसंवर्धनाचा विचार नको का यायला?
    ‘येथल्या पिंपळपानावरती अवघें विश्व तरावें’ हे मंगेश पाडगावकरांनी रचलेले सूक्त अंतःकरणात अधोरेखित व्हायला हवे!