>> रुग्णसंख्येत ३० टक्क्यांनी वाढ; मागील १०० दिवसांतील सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद
देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, गेल्या २४ तासांत १७ हजार ३३६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला. आदल्या दिवशीच्या तुलनेत रुग्णांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. तसेच ही मागील १०० दिवसांमधील सर्वाधिक रुग्णवाढ आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण ४,३३,६२,२९४ लोकांना कोविडची लागण झाली आहे. काल म्हणजेच गुरुवारी देशात कोरोनाचे १३,३१३ नवे रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत कोविडच्या प्रकरणांमध्ये शुक्रवारी ३०.२ टक्क्यांनी वाढ झाली. आतापर्यंत देशात कोविडमुळे एकूण ५ लाख २४ हजार ९५४ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोविडमुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही आता १.२१ टक्क्यांवर पोहोचले आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुासर, मागील २४ तासांत देशभरात एकूण १३,०२९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात रिकव्हरी रेट ९८.५९ टक्के नोंदवला गेला आहे. देशातील दैनिक संसर्ग दर आता ४.३२ टक्के एवढा झाला आहे, तर आठवड्याचा संसर्ग दर ३.०७ टक्के झाला आहे.
४ फेब्रुवारीनंतर दिल्लीत
आढळले सर्वाधिक रुग्ण
तसेच देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कोविडचे १,९३४ नवीन रुग्ण आढळले आणि संसर्गाचा दर ८.१० टक्के राहिला. यादरम्यान दिल्लीत महासाथीमुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. लक्षणीय बाब म्हणजे काल नोंदवलेली नवीन प्रकरणे ४ फेब्रुवारीनंतरची एका दिवसात आढळलेली सर्वाधिक प्रकरणे आहेत. सध्या दिल्लीत ५,७५५ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
महाराष्ट्रात आढळली
सर्वाधिक प्रकरणे
देशात सर्वाधिक कोविड रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. काल महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाची ५,२१८ नवीन प्रकरणे नोंदली गेली, तर आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. तसेच ४९८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सर्वाधिक म्हणजे २४७९ रुग्णांची भर पडली.