एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

0
4

>> निवडणूक निकाल लागून 4 दिवस उलटले तरी महायुतीला नवा मुख्यमंत्री निवडता येईना

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सादर केला. त्यानंतर मंत्रिमंडळ विसर्जित झाले. राजभवनावर पोहचत एकनाथ शिंदे यांनी राज्यपालाकांडे राजीनामा दिला. त्यामुळे 14 वी विधानसभा विसर्जित झाली आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा कार्यभार सांभाळण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. दरम्यान निकाल लागून चार दिवस उलटून गेले तरी अद्याप मुख्यमंत्रीपदाचा घोळ कायम आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला 236 जागा मिळाल्या आहेत. अत्यंत प्रचंड आणि घवघवीत यश महायुतीला मिळाले आहे. मागच्या तीन दशकात एकाही युती किंवा आघाडीला असे यश मिळवता आले नव्हते. मात्र आता महायुतीसमोर पुढचा मुख्यमंत्री कोण? याचा पेच कायम आहे.

महायुतीत भाजपाला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाला सलग तिसऱ्यांदा 100 पार जागांचे यश मिळाले आहे. त्यांच्या नावे हा नवा विक्रमच तयार झाला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवारांच्या 4 अशा 61 जागा मिळाल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री या पदावर दावा सांगितलेला नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तर आमची काही हरकत नाही असे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने म्हटले आहे.संघानेही देवेंद्र फडणवीस यांच्या नावालाच अनुमोदन दर्शवले आहे.

दुसरीकडे शिवसेनेची मागणी वेगळी आहे. महाराष्ट्रात महायुतीला जे यश मिळाले, ती विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवण्यात आली होती. त्यामुळे महायुतीने आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावे अशी मागणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून होत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाचे काय होणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.