महाराष्ट्रातील भाजपचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपच्या सर्व पदांसह सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काल बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. ’माझा आजही भाजपवर रोष नाही. पण, मला देवेंद्र फडणवीसांनी छळले आहे. त्यामुळे मी फक्त फडणवीसांवर खूप नाराज आहे. मानसिक छळामुळेच मी पक्षांतराचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी राजीनाम्यानंतर दिली. भाजपने मला अनेक मोठी पदे दिली. मी ती नाकारू शकत नाही. मी भाजपवर किंवा केंद्रातील एकाही नेत्यावर टीका केली नाही. माझ्यासोबत एकही आमदार, एकही खासदार नसल्याचे यावेळी खडसे यांनी सांगितले.
दुर्दैवी निर्णय ः फडणवीस
दरम्यान, महाराष्टाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांना प्रत्त्युत्तर देताना, खडसे यांचे पक्ष सोडून जाणे दुर्देवी आहे. पक्ष सोडताना कोणालातरी व्हिलन ठरवावे लागते. तसेच त्यांनी मला व्हिलन ठरवले आहे. मात्र कोणाच्या येण्याने वा जाण्यामुळे पक्ष थांबत नसतो असे सांगितले आहे.