‘दाबोळी’वर जकात खात्याची कारवाई
राज्याच्या जकात खात्याच्या विमान सेवा गुप्तचर विभागाने काल एका कारवाईत दाबोळी विमानतळावरील दुबई-गोवा-बंगळूर या मार्गावरील एअर इंडियाच्या एआय- ९९४ या विमानातील ५८ लाख २९ हजार रूपये किमतीचे सोने जप्त केले.हे सोने बेवारस पडलेले असल्याने कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार वरील विमानाच्या प्रसाधनगृहात २३३१ ग्रॅम वजनाच्या (दहा तोळे) २० सोन्याच्या कांड्या ठेवण्यात आल्याची माहिती जकात खात्याच्या गुप्तचर विभागाला मिळाली होती.
वरील माहितीनुसार जकात आयुक्त के. अनपझाकन व संयुक्त जकात आयुक्त एस. के. सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक जकात आयुक्त एस. के. सिंग, अधिक्षक एस. व्ही. पवार, अधिकारी मनोज कुमार, हवालदार आर. व्ही. तारी यांनी भाग घेतला.