एअर इंडियाच्या विमानांवर आत्मघाती हल्ल्याचा इशारा

0
98

मुंबई, अहमदाबाद, कोची विमानतळांवर कडक बंदोबस्त
एअर इंडियाच्या दोन विमानांवर आज सकाळी आत्मघाती दहशतवादी हल्ले करणार असल्याची गुप्तचरांकडून माहिती मिळाल्याने मुंबई, अहमदाबाद व कोची येथे अती दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. नवी दिल्ली येथील नागरी हवाई वाहतूक विभागाच्या मुख्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या अहमदाबाद-मुंबई व मुंबई-कोची या विमानांत आत्मघाती दहशतवादी चढण्याची शक्यता आहे.या पार्श्‍वभूमीवर वरील सर्व विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे निर्देश देण्यात आले असून प्रवाशांना कडक तपासणीस सामोरे जावे लागणार आहे. या अनुषंगाने सर्व मोक्याच्या ठिकाणांवर दहशतवादविरोधी विभाग उभारण्यात आले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २४ ऑक्टोबर हा गुजरात दिन व २५ ऑक्टोबर या दिवशी भाऊबीज सण असल्याने वरील सर्व ठिकाणी धामधूम असते. त्याचा लाभ घेऊन हल्ले घडविण्याचा डाव आहे. त्यामुळे आज सर्वच विमानांवर प्रवाशांची कसून झडती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. नागरी हवाई वाहतूक विभागाच्या उपायुक्तांनी या अनुषंगाने खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यासंदर्भात २२ ऑक्टोबर रोजी पत्र पाठवून कळविले आहे. विमानतळ संचालक आर. के. सिंग यांनी याला दुजोरा दिला आहे. एअर इंडियाच्या वरील दोन विमानांवर आत्मघाती हल्लेखोर चढण्याची माहिती आम्हाला देण्यात आली असून त्या दृष्टीने सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सूत्रांच्या माहितीनुसार ‘इसिस’ व अल कायदा या दहशतवादी संघटनांनी भारतात हल्ले घडविण्याची योजना आखली आहे.