अहमदाबाद येथे 12 जून रोजी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्यानंतरही एअर इंडियाच्या अडचणी संपलेल्या नाहीत. काल मंगळवारी दिवसभरात एअर इंडियाची 7 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यापैकी सहा विमाने ही बोईंग ड्रीमलायनरशी संबंधित होती. दिल्लीहून पॅरिसला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचेे उड्डाण टेकऑफपूर्वी रोखण्यात आले. विमानाच्या अनिवार्य तपासणीदरम्यान विमानात तांत्रिक बिघाड आढळून आल्यानंतर उड्डाण रद्द करण्यात आले. काल सकाळी अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द झाले. त्यानंतर अमृतसरहून लंडनला जाणारे विमानही रद्द करण्यात आले. तसेच त्यानंतर दिल्लीहून पॅरिसला जाणारे एअर इंडियाचे विमानही रद्द करण्यात आले आहे. तांत्रिक गोंधळाबरोबरच खराब हवामानाचाही फटका एअर इंडियाच्या सेवेला बसला आहे. मंगळवारी दिवसभरात विविध शहरांमधून आंतरराष्ट्रीय उड्डाण घेणाऱ्या तीन विमानांना रद्द करण्यात आले.
एअर इंडियाकडून याबद्दल निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात एअर इंडियाच्या प्ररिसला जाणाऱ्या विमानाची पूर्वतपासणी करण्यात आल्यानंतर त्याचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. वेळेची कमतरता आणि पॅरिस चार्ल्स डी गॉल या पॅरिसमधील विमानतळावर रात्रीच्या वेळेस निर्बंध असल्याने विमान कंपनीने विमानाचे उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला.
आज 18 जून रोजी पॅरिसहून दिल्लीला जाणारे परतीचे विमानदेखील रद्द करण्यात आले आहे. प्रवाशांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.