
ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यातील ‘ऍशेस’ मालिकेला आजपासून ‘गॅब्बा’ मैदानावर सुरुवात होत आहे. मागील २९ वर्षांत कांगारूंच्या संघाला या मैदानावर पराभूत करणे कोणत्याही संघाला शक्य झाले नसून इंग्लंडने तर ३१ वर्षांपूर्वी या मैदानावर विजयाची चव चाखली होती. यजमान म्हणून ऑस्ट्रेलियाला पसंती असली तरी इंग्लंडला कमी लेखून चालणारे नाही.
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर मानदुखीने तर शॉन मार्श पाठदुखीने त्रस्त असून कर्णधार स्मिथने वॉर्नर खेळणार असल्याची ग्वाही दिली आहे. मार्श न खेळल्यास त्याच्या जागी ग्लेन मॅक्सवेलला ‘राखीव’ खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. इंग्लंडचा संघ पूर्ण तंदुरुस्त असून चार तज्ज्ञ वेगवान गोलंदाज व मोईन अलीच्या रुपाने फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू असे त्यांचे गोलंदाजीचे समीकरण असेल. कांगारूंनी मात्र केवळ तीन वेगवान गोलंदाज व नॅथन लायनच्या रुपात एक स्पेशलिस्ट फिरकीपटू खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने कॅमेरुन बॅनक्रॉफ्ट, टिम पेन, पीटर हँड्सकोंब तर इंग्लंडने मार्क स्टोनमन, जेम्स व्हिन्स व डेव्हिड मलान या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नसलेल्या खेळाडूंना ‘अंतिम ११’मध्ये स्थान दिले आहे. त्यामुळे प्रतिकुल परिस्थितीत स्वतःला सिद्ध करण्याचा दबाव या सहा खेळाडूंवर सर्वाधिक असेल.